नागपूर : समृद्धी महामार्गावर प्रवाशांची वाहने पंक्चर करून लुटण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आल्याचा एका प्रवाशाचा व्हिडीओ सध्या साेशल मीडियावर खुप व्हायरल हाेत आहे. मात्र हा व्हिडीओ चुकीचा संदेश टाकून संभ्रम पसरविणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. समृद्धीवर चाेरांनी खिळे टाकले नाहीत, तर सिमेंट रस्त्याच्या बारीक भेगा बुजविण्यासाठी ‘इपॉक्सी ग्राउटिंग’ तंत्राचे इन्जेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंज छ. संभाजीनगर येथे दाैलताबाद पाेलीस स्टेशन हद्दीत मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीकडे महामार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू हाेते. यामध्ये महामार्गावर १०० मिटरच्या परिसरात ‘इपॉक्सी ग्राउटिंग’चे काम केले जात हाेते. याअंतर्गत काँक्रीट रस्त्यावरील बारीक भेगेमध्ये इंजेक्शनद्वारे मिश्रण टाकण्यासाठी नोझल लावण्यात आलेले होते. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी बॅरिकेट उडवून काम सुरू असलेल्या भागातून गाडी घातल्या मुळे प्रवाशांच्या गाड्या पंक्चर झाल्या होत्या. मंगळवारी रात्री झालेल्या या प्रकारानंतर एका प्रवाशाने सुरक्षेचे कारण देत गाेंधळ केला हाेता. हाच व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ज्यामुळे गाेंधळ उडाला आहे.
याबाबत महामार्ग प्रशासनाने बुधवारी भूमिका स्पष्ट केली आहे. सदर ठिकाणी चोरीचा कुठलाही प्रकार नाही तसेच कोणहिती हानी झालेली नाही. एमएसआरडीसीच्या वतीने देखभालीचे काम सुरू आहे. या बाबत महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. सदर महामार्ग देखभालीचे काम पूर्ण झाल्याने बुधवारी रस्त्यावरील नाेझल काढण्यात आलेले असून वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.
इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे काय?
- व्हीएनआयटीच्या सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक डाॅ. विश्रुत लांडगे यांनी सांगितले, सिमेंट राेडवरील बारीक भेगांमधून पावसाचे पाणी शिरल्यामुळे आतमधील लाेखंडाच्या सळाकांना जंग लागण्याची शक्यता असते.
- त्यामुळे या बारीक भेगा बुजविण्यासाठी ‘इपॉक्सी ग्राउटिंग’ हे प्रभावी तंत्रज्ञान ठरले आहे.
- इपॉक्सी ग्राउटिंगमध्ये दोन भागांचे उच्च-शक्तीचे इपॉक्सी रेझिन (राल) वापरले जाते. हे कमी-चिकटपणाचे (वाॅटर सिलंट) मिश्रण भेगेमध्ये खिळ्यासारख्या नाेझलद्वारे टाकले जाते.
- हे रेझिन भेगेमधील रिकाम्या जागेत खोलवर शिरते व फुगते आणि भेगा पूर्णपणे भरल्या जातात. - कठोर झाल्यावर, ते काँक्रीटला पुन्हा जोडते आणि रस्त्याची मूळ ताकद परत आणते.
महामार्ग अभियंत्यांचीही चुकी
वास्तविक इपॉक्सी ग्राउटिंगसाठी वापरले जाणारे नाेझल हे खिळ्यासारखेच असतात व त्यावरून वाहन गेल्यास टायर पंक्चर हाेतातच. महामार्गावर वाहने वेगाने धावत असतात. अशावेळी दुरुस्तीचे काम सुरू असल्याच्या २०० मीटर आधी ब्लिंकर्स लाईट व कामाचा संदेश देणारे बाेर्ड लावणे गरजेचे आहे. ज्यामुळे वाहनचालक अलर्ट हाेतील व गाडीचा वेग कमी करून सुरक्षितपणे वाहने चालवतील. महामार्ग अभियंत्यांनी हा उपाय न केल्यानेच असा प्रकार झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.