समृद्धी महामार्ग स्टील घोटाळा; नागपुरात होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:38 IST2026-04-08T16:36:36+5:302026-04-08T16:38:44+5:30
Nagpur : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग स्टील घोटाळ्यात परभणी पोलिसांच्या पथकाने नागपुरात येऊन चौकशी केली. पोलिसांनी बालाजी एंटरप्रायजेससोबत आणखी काही ठिकाणी चौकशी केली.

Samruddhi Highway Steel Scam; Investigation to be conducted in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग स्टील घोटाळ्यात परभणी पोलिसांच्या पथकाने नागपुरात येऊन चौकशी केली. पोलिसांनी बालाजी एंटरप्रायजेससोबत आणखी काही ठिकाणी चौकशी केली.
जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी स्टील पुरवठ्यात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित वाहतूक कंपनीविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या जालना-नांदेड टप्प्याच्या बांधकामासाठी पीएनसी इन्फ्राटेक लि. या कंपनीने स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लि., नागपूर येथून स्टील खरेदी केले होते. या स्टीलची वाहतूक जयपूर येथील सुनीता रोड कॅरियर्स प्रा. लि. या कंपनीमार्फत केली जात होती. नागपूरहून परभणी येथे आलेल्या तीनपैकी दोन ट्रेलरमध्ये स्टीलचे वजन कमी असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीएनसी इन्फ्राटेक लि. कंपनीचे सहायक प्रशासकीय प्रबंधक उदित राकेश जैन यांनी परभणीतील नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. वाहतूक कंपनीने नागपूरहून स्टील परभणीला पोहोचविण्याची जबाबदारी रामदेव चौधरी आणि सुमित स्वामी यांच्या बालाजी एंटरप्रायजेसवर सोपवली होती. २९ जून २०२५ पासून कंपनीने स्टीलच्या अंदाजे ८० खेपा पोहोचवल्या. नोंदवलेले स्टीलचे वजन वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून डिजिटल वजनकाट्यांमध्ये फेरफार करून हा घोटाळा करण्यात आल्याचा संशय आहे. यापूर्वीही अशाच प्रकारची फसवणूक झाली आहे का, हे निश्चित करण्यासाठी परभणी पोलिस आता नागपूरमधील नोंदींची तपासणी करत आहेत.