Sale of one land to many: turnover of crores | एकाच जमिनीची अनेकांना विक्री : कोट्यवधींची उलाढाल

एकाच जमिनीची अनेकांना विक्री : कोट्यवधींची उलाढाल

ठळक मुद्देगुंतागुंतीचे प्रकरण, अनेकांची झाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, ७ जून २०११ ते १५ मार्च २०१९ दरम्यानचे हे प्रकरण असून, त्यासंंबंधाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी कळविली आहे.
राजेश पुरुषोत्तम बोरकर (वय ५०, रा. वंदना अपार्टमेंट, गोपालनगर) आणि संजय सदुजी सोमकुवर (वय ४६, रा. सुरेंद्रनगर) या दोघांची जम्बुदीप बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स नावाने फर्म आहे. त्यांनी उर्मिला होमदेव जाधव (रा. श्री महालक्ष्मीनगर, नरसाळा), अशोक दत्तूजी मसराम (रा. आदिवासीनगर, दिघोरी) या दोघांकडून १६ नोव्हेंबर २०१० ला भास्कर चव्हाण, उमाबाई खंडाळे, किसन चव्हाण आणि पार्वताबाई गायकवाड यांच्या मुळ मालकीची मौजा चिखली खुर्द येथील २ हेक्टर ९७ आर शेतजमीन विकत घेण्याचा करार केला होता. या जमिनीचा विकास होणार नसल्यामुळे आरोपी जाधव आणि मसरामकडून शेतजमिनीवर डुप्लेक्स बांधून ते विकण्याचा करारनामा बोरकर आणि सोमकुंवर यांनी करून घेतला. मात्र, ही शेतजमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्याचे सुधार प्रन्यासकडून स्पष्ट करण्यात आल्याने, बोरकर आणि सोमकुंवरने ७० लाख रुपये प्रति एकर भावाने साडेतीन कोटी रुपयांत पाच एकर जमिनीचा सौदा करून रोख तसेच धनादेशाद्वारे ५० लाख रुपये आणि नंतर १ कोटी २२ लाख असे एकूण १ कोटी ७२ लाख रुपये आरोपी जाधव आणि मसरामला दिले. त्याबदल्यात आममुख्त्यारपत्र तयार करून घेण्यात आले. बोरकर आणि सोमकुंवर या
शेतजमिनीवर नंतर ले-आऊट टाकण्यास गेले. त्यावेळी मूळ शेतमालकांपैकी किसन चव्हाण, पार्वताबाई गायकवाड यांनी ०.९८ हेक्टर जमीन २५ जुलै १९९३ ला विकल्याचे उघड झाले. परिणामी, बोरकर आणि सोमकुंवर यांनी उरलेल्या अडीच एकर शेतजमिनीपैकी सव्वाएकर जमीन मूळ मालक उमाबाई खंडाळे यांच्याकडून खरेदी केली. नंतर तेथे जम्बुदीप बिल्डरच्या नावाने ले-आऊट टाकून अरुणा भास्करराव रोकडे यांना ६ जून २०१६ ला तर नीलेश मेश्राम (लाखांदूर, भंडारा) यांना १५ जानेवारी २०१६ ला विकला.
त्याची माहिती असूनही आरोपी जाधव आणि मसरामने बनावट सुभाष काळे आणि आशिष सरोदे या दोघांना १५ जानेवारी २०१९ ला तेथील भूखंडाची विक्री करून दिली. ते कळाल्यावर बोरकर आणि सोमकुंवरने आरोपी जाधव आणि मसरामला विचारणा केली असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे बोरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आरक्षित जमिनीची खरेदी विक्रीच संशयास्पद !
विशेष म्हणजे, पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असताना ती बिल्डर आणि डेव्हलपर्सने विकत घेतलीच कशी आणि आरक्षित जमिनीवर ले-आऊट टाकून लाखो रुपये घेऊन दुसऱ्यांना तेथील भूखंड विकलेच कसे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. या संबंधाने पोलिसांकडून गोलमाल उत्तरे दिली जात असल्याने हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद बनले आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Sale of one land to many: turnover of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.