RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत

By योगेश पांडे | Updated: May 18, 2025 23:53 IST2025-05-18T23:51:32+5:302025-05-18T23:53:57+5:30

Saifullah Khalid Rss News: २००६ च्या मे महिन्यात संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात झाली होती. रेशीमबागेत वर्ग सुरू होता व त्यानिमित्ताने संघाचे अनेक तत्कालीन पदाधिकारी नागपुरात होते.

Saifullah, the mastermind behind the attack on RSS headquarters, was killed after 19 years, the Sangh circle welcomed the action of an 'unknown' person | RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत

RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत

- योगेश पांडे, नागपूर
२००६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रजाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आला. नागपुरातील त्या हल्ल्याचा तब्बल १९ वर्षांनंतर अज्ञातांनी बदला घेतल्याच्या कृतीचे संघ वर्तुळातून स्वागत करण्यात येत होते. संघाकडून मात्र याबाबत अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२००६ च्या मे महिन्यात संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात झाली होती. रेशीमबागेत वर्ग सुरू होता व त्यानिमित्ताने संघाचे अनेक तत्कालीन पदाधिकारी नागपुरात होते. संघ कार्यकर्त्यांना घडविणारा वर्ग सुरू असतानाच हल्ला करण्याचा कट अबू सैफुल्लाने रचला होता. 

1 जून २००६, आरएसएस मुख्यालयावर हल्ल्याचा कट, काय घडलं होतं?

तत्कालीन सरसंघचालक के. सी. सुदर्शन व सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत त्यावेळी मुख्यालयात नसले तरी इतर मोठे पदाधिकारी संघ मुख्यालयात होते. १ जून २००६ रोजी पहाटे चार वाजता तीन दहशतवादी लाल दिवा असलेली ॲम्बेसेडर गाडी घेऊन संघ मुख्यालयाकडे निघाले होते. 

वाचा >>कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात

सुरक्षा यंत्रणेतील जवानांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र गाडी बॅरिकेड्स तोडून समोर निघाली होती. आत बसलेल्या तीनही दहशतवाद्यांजवळ एके ५६ पाहून नागपूर पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी गाडीचा पाठलाग केला. 

तीन दहशतवादी चकमकीत ठार

आरोपींनी गोळीबार केला व चकमकीत अफजल अहमद बट, बिलाल अहमद आणि मोहम्मद उस्मान हबीब हे तिघेही मारले गेले होते. नागपूर पोलिसांच्या या कारवाईचे मोठे कौतुक झाले होते व त्यांच्या तत्परतेमुळे संघ मुख्यालय वाचले होते.

या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. नागपूरमध्ये झालेला तो पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला होता. सैफुल्ला हा लष्कर-ए-तोएबाच्या अबू अनसचा उजवा हात होता. सैफुल्लाने संघ मुख्यालयावरील हल्ल्याचा कट रचला होता. त्याने तीनही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन संघ मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी पाठविले होते. 

दहशतवाद्यांकडून तीन एके ५६ रायफली, पाच किलो आरडीएक्स, १४ हँडग्रेनेड होते. कारमधून पोलिसांनी एक टिफिन बॉम्बदेखील जप्त केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरून संघ मुख्यालय उडविण्याचेच टार्गेट घेऊन आरोपी आल्याचे स्पष्ट झाले होते.

कोण आहेत ते ‘अज्ञात’ ?

सैफुल्ला रविवारी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन येथे अज्ञात व्यक्तींच्या गोळीबारात ठार झाला. त्याचे मारेकरी कोण आहेत हे समोर आलेले नाही. मात्र मागील काही काळापासून जगातील विविध देशांमध्ये ‘अज्ञात’ व्यक्तींनी अनेक भारतविरोधी तत्त्वांचा खात्मा केला. त्यामुळे संघ वर्तुळातून सैफुल्लाच्या मृत्यूचे स्वागत होत असतानाच ते अज्ञात कोण याबाबत चर्चा रंगल्या होत्या. 

सैफुल्ला अनेक वर्षे नेपाळमधून ऑपरेट करत होता व काही काळापसून तो पाकिस्तानमध्येच दहशतवाद्यांच्या भरती व प्रशिक्षणाचे काम पाहत होता.

Web Title: Saifullah, the mastermind behind the attack on RSS headquarters, was killed after 19 years, the Sangh circle welcomed the action of an 'unknown' person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.