लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरण पादुकांचे आज नागपूर शहरात आगमन झाले. शहराच्या सिमेवर असलेल्या चिचभूवन चाैकात सायंकाळी सुमारे ४ च्या सुमारास बाबांच्या चरण पादूका घेऊन येणारा 'साई रथ' पोहचला. यावेळी ठिकठिकाणांहून दर्शनासाठी जमलेल्या हजारो भक्तांनी विविध फुलांची उधळण करत बाबांचा एकच जयघोष केला.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ शिर्डी यांच्या विशेष सहकार्याने श्री सद्गुरु साई चॅरिटेबल ट्रस्ट, साई पालखी परिवार आणि साई भक्त साई सेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई चरण पादुका दर्शन महोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून भाविकांची तयारी सुरू होती. ज्या ठिकाणी बाबांच्या चरण पादूका येणार त्या चिंचभवन चौकात शुक्रवारी दुपारी २ वाजता पासून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यांवर फुलांच्या पाकळ्यांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ढोल ताशा आणि लेझिम पथकांचा लयबद्ध गजर सुरू होता. एकाच रंगाच्या साडी चोळीतील महिला मुलींचे लेझिम नृत्य आणि मध्ये बाबांच्या नावाचा जयघोष यामुळे वातावरण भारावल्यासारखे झाले होते. सुमारे ४ वाजताच्या सुमारास श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचे आगमन झाले.
शिर्डीहून या पादुका साई रथातून घेऊन येणारे शिर्डी संस्थानचे पदाधिकारी, सुरक्षा रक्षक, पुजारी आणि सेवेकरी यांनी स्थानिक भाविकांना या पादुका सोपविल्या. त्या फुलांनी सजविलेल्या एका छोट्या रथात ठेवल्यानंतर चाैकाजवळच्या साई गेस्ट हाऊससमोर आरती करण्यात आली. त्यानंतर श्री साई पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथासमोर महिला-पुरुषांची बाईक रॅली होती. ढोल-ताशा पथक, शंख पथक, बॅण्ड पथक, लेझीम पथकाचे प्रदर्शन सुरू होते. गंगा आरती, फटाका शो आणि नेत्रदीपक लाईट शो दरम्यान भक्ताचा जयघोष सुरू होता.
जागोजागी स्वागत
चिंचभुवन चौकातून निघालेल्या या मिरवणूकीचे सोमलवाडा, राजीव नगर, नरेंद्र नगर, मानेवाडा, क्रीडा चौक, महाल, बडकस चौक, गडकरी वाडा आणि चिटणीस पार्क दरम्यान जागोजागी भाविकांनी जोरदार स्वागत केले. वृत्त लिहिस्तोवर श्रींच्या पादुकांची मिरवणूक शहरात फिरतच होती.
दोन दिवस चालणार दर्शन सोहळा
चिटणीस पार्क महाल येथे बाबांच्या चरण पादुकां ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी शनिवारी (दि. ११) सकाळी साडेपाच वाजता पासून दर्शनाची व्यवस्था सुरू होईल. ती रविवारीपर्यंत उपलब्ध राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने या दर्शन सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन साईभक्तांनी केले आहे.
Web Summary : Shirdi's Sai Rath, carrying sacred footprints, arrived in Nagpur, greeted by thousands. A grand procession with music and dance marked the event. Devotees can view the footprints at Chitnis Park. The event continues for two days.
Web Summary : शिरडी से साईं रथ नागपुर पहुंचा, हजारों ने स्वागत किया। संगीत और नृत्य के साथ भव्य जुलूस निकाला गया। भक्त चिटनिस पार्क में चरण पादुकाओं के दर्शन कर सकते हैं। दर्शन दो दिन चलेगा।