साहिल सय्यदवरून भाजप- राष्ट्रवादीत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 07:55 PM2020-07-17T19:55:22+5:302020-07-17T19:59:23+5:30

महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या ‘ऑडिओ क्लिप’मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या क्लिपसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजपच्या गोटातून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

On Sahil Syed, clashed in BJP-NCP | साहिल सय्यदवरून भाजप- राष्ट्रवादीत जुंपली

साहिल सय्यदवरून भाजप- राष्ट्रवादीत जुंपली

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप नेत्यांसोबत संबंधाचा गृहमंत्र्यांचा आरोपकाँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचेही फोटो व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या ‘ऑडिओ क्लिप’मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या क्लिपसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजपच्या गोटातून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या क्लिपमधील साहिल सय्यद याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करत पक्षातीलच अंतर्गत वादातून हा षड्यंत्राचा प्रकार झाला असल्याची शक्यता देशमुख यांनी त्यातून वर्तविली आहे. देशमुखांच्या या पत्रामुळे राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांअगोदर काही ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर ही ‘क्लिप’ गेली. या ‘क्लिप’मध्ये महापौर संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून अडचणीत आणण्यासंदर्भात साहिल सय्यदचे संभाषण होते. दोन्ही नेत्यांना अडचणीत आणताना कुठेही समोर यायचे नाही व पडद्यामागे राहूनच हालचाली करायच्या आहेत, अशीदेखील दोघांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. सोबतच तिवारी यांनीदेखील पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. साहिल सय्यद हा भाजपचाच कार्यकर्ता असून त्याची प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासमवेत व्यावसायिक भागीदारी आहे. तुमच्याच पक्षातील व्यक्ती पक्षाच्या नेत्यांचा हनी ट्रॅप करण्यासंदर्भात प्रयत्न करतो आहे, ही आश्चर्याची बाब आहे. हा भाजपमधील अंतर्गत वादाचा प्रश्न दिसतो, असे अनिल देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, साहिल सय्यदसोबत असलेले नेत्यांचे फोटो भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केले जात असून साहिलचा संबंध दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी किती जवळचा आहे, हे दाखिवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

साहिलची चौकशी होणार
दरम्यान, साहिल सय्यदची चौकशी होणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. साहिल सय्यदने न्यायव्यवस्थेला मॅनेज करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल संघर्ष
साहिल सय्यद याचे कोण्या एका पक्षाच्या नेत्यांसोबतच नव्हे तर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसमवेत छायाचित्रे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून इतर पक्षीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहते. हा व्हायरल संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुरावे द्या किंवा माफी मागा
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहमंत्र्यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. साहिल सय्यदसोबत आपली कुठलीही व्यावसायिक भागीदारी नाही. गृहमंत्र्यांनी खोटे पत्र पाठविले आहे. अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत त्याचे त्यांनी पुरावे सादर करावे अन्यथा माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे. साहिल सय्यद हा मुळात भाजपचा कार्यकर्ता नाही. शिवाय त्याच्याशी कुठलेही व्यावसायिक संबंध नाहीत. अनिल देशमुख यांनी आरोप सिद्ध करावे किंवा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका सुधाकर देशमुख यांनी मांडली.

Web Title: On Sahil Syed, clashed in BJP-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.