ऋण फेडण्यासाठी शेवटचा श्वासही समाजाला अर्पण; पहिल्यांदाच पोलिसाकडून अवयवदान
By सुमेध वाघमार | Updated: August 10, 2023 18:19 IST2023-08-10T18:19:11+5:302023-08-10T18:19:29+5:30
पत्नीने ठेवला समाजापुढे आदर्श

ऋण फेडण्यासाठी शेवटचा श्वासही समाजाला अर्पण; पहिल्यांदाच पोलिसाकडून अवयवदान
सुमेध वाघमारे
नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस आपल्या प्राणांची पर्वा करत नाही. ऋण फेडण्यासाठी शेवटचा श्वासही समाजाला अर्पण करतात. एका पोलसी कुटुंबाने असाच एक आदर्श समाजासमोर ठेवला. आपल्या पोलीस पतीचा अवयवदानासाठी त्या दु:खातही तिने पुढाकार घेतला. ती स्वत: पोलीस असल्याने कोणत्याही प्रसंगाला सामोर जाणारा वदीर्वाला तिच्यातही दिसला.
किशोर तिजारे त्या अवयवदात्याचे नाव. तिजारे हे पोलीस हवालदार म्हणून नागपूर शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ८ आॅगस्ट रोजी ते ड्युटीवर असताना काही महत्त्वाचा कामानिमित्त दुचाकीने गिट्टीखदान चौकाकडे जात असताना त्यांचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. विवेक देशपांडे, डॉ. अमोल कोकस या डॉक्टरांच्या पथकाने तपासून त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदु मृत घोषीत केले.
पोलीस दलातच कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी सपना तिजारे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी नातेवाइकांना अवयवदानाचा सल्ला दिला. त्या दु:खातही अवयवदान करण्याचा मानवतावादी निर्णय त्यांचा पत्नीने घेतला. याला किशोर तिजारे यांचे भाऊ किरण तिजारे व वहिनी अपेक्षा तिजारे यांनीही संमती दिली. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक दिनेश मंडपे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली.
- दोन रुग्णांना मिळाले जीवनदान
‘झेडटीसीसी’च्या नियमानुसार एक किडनी न्यू इरा हॉस्पिटलच्या ४७ वर्षीय रुग्णाला तर दुसरी किडनी केअर हॉस्पिटलच्या ३० वर्षीय रुग्णाला दान करण्यात आली. कॉर्निआ महात्मे आय बँकेला देण्यात आले. वैद्यकीय कारणांमुळे त्यांचे यकृत दान होऊ शकले नाही. नागपुरात ‘झेडटीसीसी’ स्थापन झाल्यानंतर २०१३मध्ये पहिले ब्रेन डेड व्यक्तींकडून अवयवदान झाले. आतापर्यंत ११३ अवयवदान झाले. गुरूवारी झालेले हे अवयवदान या वर्षातील १६ वे होते.