सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार
By योगेश पांडे | Updated: October 9, 2025 00:09 IST2025-10-09T00:09:22+5:302025-10-09T00:09:45+5:30
Nagpur News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे.

सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार
- योगेश पांडे
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे.
सरन्यायाधीशांवर राकेश किशोर या वकिलाने सोमवारी न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला व यावरून राजकारणदेखील तापले आहे. निखील वागळे यांनी या मुद्द्यावरून एक्सवर निखील वागळेंनी विविध पोस्ट केल्या. त्यांना या हल्ल्याचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातनवादी तसेच हिंदुत्ववाद्यांशी जोडला. यावरून भाजप विधी सेलचे अध्यक्ष ॲड.परिक्षित मोहिते यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वागळे यांनी या विषयात कुठेही संबंध नसताना भाजप व संघाचे नाव जोडले. तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या जातीयवादी पोस्ट केल्या. या पोस्ट टाकण्यामागे वागळे यांचा उद्देश सामाजिक शांतता भंग करणे हाच असल्याचा आरोप ॲड.मोहिते यांनी तक्रारीत केला आहे. त्यांनी वागळेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची शहानिशा करून पोलीस पुढील पावले उचलतील.