हा मार्ग धोक्याचा आहे! कळमेश्वर-काटोल-नागपूर मार्ग झाला खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 21:50 IST2020-08-14T21:48:25+5:302020-08-14T21:50:23+5:30
व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.

हा मार्ग धोक्याचा आहे! कळमेश्वर-काटोल-नागपूर मार्ग झाला खड्डेमय
आशिष सौदागर/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा मार्ग असून कळमेश्वर, काटोल, नरखेड ते वरुड तालुक्यापर्यंतच्या वाहतुकीचा दुवा म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील वाढती वाहतूक व औद्योगिकीकरण, शिक्षण झोन लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे तातडीने नुतनीकरण करणे गरजेचे होते.
नागपूर शहरातील जुन्या काटोल रोड नाक्यापासून ते कळमेश्वर न.प.च्या हद्दीपर्यंत या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याच १५ कि.मी.च्या अंतरात अनेक शाळा, महाविद्यालये, मोठ्या शैक्षणिक संस्था, दोन धार्मिक स्थळे आहे. त्यामुळे येथे सकाळी ९ ते रात्री ९ या काळात वाहतूक अधिक असते. रस्त्यात साधा अपघात झाला तर जाम लागतो.
पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने जड वाहनामुळे या मार्गावरील डांबर उखडत चालले आहे. गत आठ वर्षात या मार्गावर अनेक जणांचा बळी गेला. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गत पाच वर्षापासून मागणी आहे. मात्र कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही.
राज्याचे गृृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघा पर्यंत हा मार्ग जातो. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा धापेवाडा येथे जाताना याच मार्गावरून जावे लागते. यासोबतच पशुसंवर्धन मंत्री केदार यांना नागपूर येथून कळमेश्वर (मतदारसंघ) येथे जाता या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तीन महत्त्वाचे मंत्री या मार्गावरून नेहमी जात असताना या मार्गाचे रुंदीकरण किंवा किमान व्यवस्थित डागडुजी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला रस का नाही, हाही एक प्रश्नच आहे. मधल्या काळात गडकरी यांनी या मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी पुढाकार घेतला होता. मात्र या कामाला फारसा वेग आला नाही.
नागपूर-कळमेश्वर मार्गाने गत दहा वर्षात वाहतूक वाढली आहे. मात्र मार्गाची रुंदी आहे तीच आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. फेटरी परिसरात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे.
- धनश्री मुकेश ढोमणे, सरपंच फेटरी