नागपुरात लंडनहून परतलेले दोघे मेडिकलमध्ये भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 07:00 IST2020-12-26T07:00:00+5:302020-12-26T07:00:07+5:30
Nagpur News विदेशातून परतणाऱ्यावर नागपुरात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषकरून ब्रिटन व अमेरिकेतून परतलेल्या प्रवाशांची माहिती मनपा मिळवित आहे. लंडनहून परतलेली एक महिला व त्यांच्या मुलीला आज कोरोनाची पुष्टी झाली आहे.

नागपुरात लंडनहून परतलेले दोघे मेडिकलमध्ये भरती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशातून परतणाऱ्यावर नागपुरात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषकरून ब्रिटन व अमेरिकेतून परतलेल्या प्रवाशांची माहिती मनपा मिळवित आहे. लंडनहून परतलेली एक महिला व त्यांच्या मुलीला आज कोरोनाची पुष्टी झाली आहे. त्यांना मेडिकलच्या विशेष वाॅर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यास मेडिकल व मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लंडनहून नागपुरात परतलेली ४२ वर्षीय महिला व तिच्या मुलीची माहिती मनपाला विमानतळाहून परतलेल्या प्रवाशांच्या यादीतून मिळाली. त्यानंतर मनपाचे पथक त्यांच्या घरी पोहचले. त्यांचे नमुने घेतले, त्यात कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर त्यांना मेडिकल कॉलेजमधील विशेष वाॅर्डमध्ये भरती करण्यात आले. मेडिकल कॉलेजकडून त्यांचे नमुने घेण्यात आले व मेयोच्या लॅबच्या माध्यमातून विशेष स्ट्रेनसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. नंदनवन येथील एका रुग्णाचा नमुना मेडिकलमध्ये निगेटिव्ह आला आहे तर पुणे येथील लॅबच्या रिपोर्टबाबत मनपा प्रशासनाकडून कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. आज भरती करण्यात आलेल्या रुग्णाबद्दलही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जास्त माहिती देऊ नका असे आदेश प्रशासन व मेडिकलला दिले आहे. नागपुरात विदेशातून परतलेल्या लोकांची स्क्रीनिंग करण्यात येत आहे. विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
- विदेशातून परतलेल्या लोकांवर ठेवत आहे विशेष नजर
मनपाचे अप्पर आयुक्त जलज शर्मा यांनी लोकमतला सांगितले की विदेशातून परतलेल्या प्रवाशांवर विमानतळावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तर गेल्या महिन्याभरात जे प्रवासी नागपुरात आले त्यांचाही शोध घेतला जात आहे. दोन रुग्णांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांचे नमुने पुण्यात पाठविण्यात येणार आहे. नंदनवनच्या रुग्णाच्या रिपोर्टसंदर्भात माहिती नाही. मेयो लॅबला त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यासाठी दिले आहे.