लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धा, देवळी येथील रहिवासी अशोक सावरबांधे (५२) ‘बे्रन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सावरबांधे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत व मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.प्राप्त माहितीनुसार, आजारी बहीण पुष्पा कामडी यांची विचारपूस करण्यासाठी ५ डिसेंबर रोजी अशोक सावरबांधे सेवाग्राम येथे जात होते. याच दरम्यान वर्धा येथील दयाळ चौकजवळ त्यांची बाईक मोकाट जनावराला धडकली. जखमी अवस्थेत त्यांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु सुधारणा होत नसल्याचे पाहत नागपूर लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांना स्थानांतरित केले. डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु शनिवारी सकाळी ७.१० वाजता डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) घोषित केले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या चमूने त्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मुलाग सूरज सावरबांधे यांनी यात पुढाकार घेत वडिलांचीही इच्छा अवयवदानाची होती असे सांगून सहमती दर्शवली. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी व ‘रिट्रायव्हल अॅण्ड ट्रान्सप्लँटेशन कॉआॅर्डीनेटर’ वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.आतापर्यंत २९ यकृताचे प्रत्यारोपण‘झेडटीसीसी’ स्थापन झाल्यानंतर २०१३ ते आतापर्यंत ४२ ‘ब्रेन डेड’ दात्यांची नोंद झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत २९ यकृताचे प्रत्यारोपण झाले. यातील एकट्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये १४ यकृत प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले. हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, हृदयरोग विशेषज्ञ डॉ. आनंद संचेती, कार्डियोलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. साहिल बंसल यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.७६वे मूत्रपिंड प्रत्यारोपणगेल्या पाच वर्षांत ब्रेन डेड दात्यांकडून आतापर्यंत ७६ मूत्रपिंड मिळाले. यात सावरबांधे यांच्या दोन मूत्रपिंडापैकी एक न्यू इरा हॉस्पिटल तर दुसरे वोक्हार्ट हॉस्पिटलला देण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. प्रकाश खेतान, युरो सर्जन डॉ. रवी देशमुख, डॉ. साहिल बन्सल व सविता जयस्वाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
त्यांच्या इच्छेमुळे मिळाले तिघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:31 IST
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धा, देवळी येथील रहिवासी अशोक सावरबांधे (५२) ‘बे्रन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सावरबांधे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत व मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.
त्यांच्या इच्छेमुळे मिळाले तिघांना जीवनदान
ठळक मुद्दे यकृत, दोन्ही मूत्रपिंडाचे दान : वर्धेच्या सावरबांधे कुटुंबीयांचा पुढाकार