हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे विख्यात न्युरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन
By सुमेध वाघमार | Updated: December 31, 2025 14:42 IST2025-12-31T14:39:56+5:302025-12-31T14:42:24+5:30
Nagpur : मूळचे लाखनी (सलोटी) व सध्या रामदासपेठ येथील 'हॅपी हाईट्स' येथील रहिवासी असलेले डॉ. पाखमोडे बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

Nagpur's renowned neurosurgeon Dr. Chandrashekhar Pakhmode passes away due to heart disease
नागपूर: आपल्या कौशल्याने हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे आणि नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक आधारस्तंभ, न्युरॉन हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे (५५) यांचे बुधवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचीच नव्हे, तर समाजाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ. मनीषा, मुलगा डॉ. अद्वैत, मुलगी अनन्या आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मूळचे लाखनी (सलोटी) व सध्या रामदासपेठ येथील 'हॅपी हाईट्स' येथील रहिवासी असलेले डॉ. पाखमोडे बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने धंतोली येथील त्यांच्या 'न्युरॉन हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीर्चेे प्रयत्न केले, मात्र सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
एक समर्पित वैद्यकीय प्रवास
डॉ. पाखमोडे यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (जीएमसी) एमबीबीएस आणि एम.सी.एच. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या नामांकित केईएम हॉस्पिटलमधून न्युरोसर्जरीचे उच्च शिक्षण घेतले. ‘जीएमसीएच’शी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच वर्षे सेवा दिल्यानंतर, मार्च २०१४ मध्ये त्यांनी प्रसीद्व न्युरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी यांच्या सोबते न्युरॉन हॉस्पिटलची स्थापना केली. अत्यंत शांत, संयमी स्वभाव आणि रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे ते रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून ओळखले जात. कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात त्यांचा हातखंडा होता.
वैद्यकीय विश्वातून हळहळ आणि श्रद्धांजली
डॉ. पाखमोडे यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. एक अभ्यासू, तज्ज्ञ आणि रुग्णांविषयी कळवळा असलेला संवेदनशील डॉक्टर आपण गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली संवेदना व्यक्त केली. यासह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.