राज्यातील हजारो एसटी महिला कर्मचाऱ्यांना दिलासा; आता ‘डे’शिपमध्येच मिळणार काम

By नरेश डोंगरे | Updated: May 6, 2025 18:49 IST2025-05-06T18:47:28+5:302025-05-06T18:49:29+5:30

Nagpur : आदेश अद्याप मिळाला नाही

Relief for thousands of ST women employees in the state; Now they will get work only in 'day' ship | राज्यातील हजारो एसटी महिला कर्मचाऱ्यांना दिलासा; आता ‘डे’शिपमध्येच मिळणार काम

Relief for thousands of ST women employees in the state; Now they will get work only in 'day' ship

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
घरापासून लांब अंतरावर रोजच्या रोज 'नाईट दिव्य' पार पाडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील हजारो महिलांना आता लवकरच मुक्ती मिळणार आहे. परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांच्या अधिवेशनात या संबंधाने केलेली घोषणा एसटीतील महिला कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.


मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वळल्यानंतरही विविध अडचणीमुळे एसटीला रोज अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. एसटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही तसेच आहे. त्यातल्या त्यात एसटीच्या चालक, वाहकांची स्थिती जास्तच बिकट आहे. बहुतांश ठिकाणच्या एसटी बस स्थानकांवर चालक, वाहकांसाठी चांगले विश्रांती गृह, स्वच्छतालये नाहीत. त्यामुळे दिवसरात्र ड्युटी करणाऱ्या चालक वाहकांना घरून निघाल्यापासून घरी पोहचेपर्यंत मोकळेपणाने विश्रांती घेता येत नाही. परुष कर्मचाऱ्याचे तर ठिक आहे. मात्र, नाईट शिफ्टमध्ये लांब अंतरावर धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची स्थिती फारच अवघडल्यासारखी होते. म्हणूनच एसटीतील बहुतांश महिला कर्मचारी रात्रपाळीची ड्युटी म्हणजे दिव्य पार पाडण्याचीच कामगिरी समजतात. या पार्श्वभूमीवर, मानगाव, रायगड येथे एसटी कामगार संघटनेच्या ५७ व्या अधिवेशनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी, ५ मे रोजी एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना रात्री ८ नंतर कर्तव्य, अर्थात नाईट ड्युटी दिली जाणार नाही, अशी घोषणा केली. ही घोषणा एसटीत वाहक म्हणून काम करणाऱ्या हजारो कर्मचारी महिलांसाठी कमालीची सुखद ठरली आहे. कारण परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनुसार आता त्यांना मिळणारी नाईट ड्युटी दिली जाणार नाही.


विदर्भात दोन विभाग
विशेष म्हणजे, विदर्भात एसटी महामंडळाचे नागपूर आणि अमरावती असे दोन प्रादेशिक विभाग आहेत. त्यात नागपूर प्रादेशिक विभागात एकूण १२३९ महिला कर्मचारी आहेत. त्यात ५४३ महिला वाहकांचाही समावेश आहे. तर, अमरावती विभागात १०३८ महिला कर्मचारी असून, त्यात ५८८ महिला वाहक कर्मचारी आहेत.


जिल्हानिहाय महिला कर्मचारी
जिल्हा          एकूण महिला कर्मचारी       महिला वाहक

नागपूर                       ४०२                              १७१
वर्धा                           २४१                              १२३
भंडारा                       २९२                               १३२
चंद्रपूर                        १९३                               ६७
गडचिरली                  १९१                                ५०
अमरावती                   ३१०                               १७२
यवतमाळ                   ३०३                               १६७
अकोला                      १५९                               ९५
बुलडाणा                    २६६                              १५४

आदेश अद्याप मिळाला नाही
या संबंधाने एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी अद्याप असा आदेश मिळाला नसल्याचे सांगितले. एसटीत महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणातच कर्तव्यावर नियुक्त केले जाते, अशी माहिती देऊन हा आदेश आल्यानंतर त्या प्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, अशी पुष्टीही गभणे यांनी जोडली.

Web Title: Relief for thousands of ST women employees in the state; Now they will get work only in 'day' ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.