प्रेमी युगुलाला लुटणारे ‘तोतया’ नव्हे तर खरे पोलीस कर्मचारी

By योगेश पांडे | Updated: April 21, 2024 22:13 IST2024-04-21T22:12:10+5:302024-04-21T22:13:15+5:30

गणेशपेठमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला कारमधील लाईट बंद करून बसले होते.

Real policemen, not 'rogues' robbing lovers | प्रेमी युगुलाला लुटणारे ‘तोतया’ नव्हे तर खरे पोलीस कर्मचारी

प्रतिकात्मक फोटो...


नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये बसलेल्या प्रेमी युगुलाला लुटणारे आरोपी तोतया पोलीस नव्हे तर खरे पोलीस निघाले. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून त्यांच्याविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशपेठमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला कारमधील लाईट बंद करून बसले होते. त्यावेळी कळमना पोलीस ठाण्यातील पंकज यादव व संदीप यादव हे दोन कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे विवाहित असलेली महिला घाबरली. पंकज आणि संदीपने त्यांना पैसे मागितले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची मागणी केली. तसेच तरुणाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चेनदेखील नेली. तरुणाने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अगोदर पोलिसांना आरोपी तोतया पोलीस असल्याची शंका आली. मात्र सीसीटीव्ही व तांत्रिक पद्धतीने तपास केला असता त्यात पंकज व संदीप हे दोघे असल्याची बाब समोर आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी याअगोदरदेखील असे प्रकार केल्याचा संशय आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले आहेत. हे दोघेही अगोदर चार्ली होते व त्यांच्याविरोधात गैरप्रकारांच्या तक्रारी आल्याने त्यांना हटविण्यात आले होते. आता पोलीस आयुक्तांकडून या दोघांवरही काय कारवाई करण्यात येते याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Real policemen, not 'rogues' robbing lovers