नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरीजवळ रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:28 IST2018-07-25T22:25:06+5:302018-07-25T22:28:46+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने साधारणत: ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.

नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरीजवळ रस्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने साधारणत: ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर हिंसक पडसाद उमटत आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको, टायरची जाळपोळ, बसेसची तोडफोड केली जात आहे. आधी शांततेने असलेले हे आंदोलन आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.
आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी कोंढाळी परिसरातील मराठा समाजबांधव बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास खापरी (बारोकर) फाटा येथे एकवटले. बाळासाहेब जाधव, विजयसिंह रणनवरे, रणजित गायकवाड, रवी गुंड, सुजित बारोकर, अनिल बारोकर, हार्दिक अहिरराव, निखिल जाधव आदींच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत रस्ता अडविला. शासनाचा निषेध करीत ट्रॅक्टरचे दोन टायर पेटविले. त्यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने जागेवर थांबली. कोंढाळी पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलकांनी एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही. असे असताना रुग्णवाहिकेला मात्र रस्ता मोकळा करून दिला, हे विशेष!
दुपारी २ वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे ताफ्यासह आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून समजूत घातली. चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल तासभर चाललेल्या या रास्ता रोकोचा नागपूर - अमरावती ये-जा करणाऱ्या अनेकांना फटका बसला.
याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.