नागपुरात आढळला दुर्मिळ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:54 IST2020-08-26T19:53:43+5:302020-08-26T19:54:45+5:30
जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

नागपुरात आढळला दुर्मिळ साप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
सर्पमित्र विशाल डंभारे यांना मंगळवारी वेळा (हरिश्चंद्र) या गावातून नेहमीपेक्षा वेगळा दिसणारा साप निघाल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच जाऊन तो पकडला. हा साप अंडी भक्षक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्याला सेमिनरी हिल्स स्थित ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरला आणले. हा साप जवळपास १०० वर्षांनंतर भारतात वर्ध्याचे सर्पमित्र पराग दांडगे यांनी २००५ साली परत शोधून काढला आणि २००८ साली तसा शोधप्रबंध पण प्रसिद्ध केला आहे.
या सापाला अंडी भक्षक साप असे म्हणतात, कारण हा पक्ष्यांची अंडी खातो, इतरही छोटी अंडी खाऊन आपली गुजराण करतो. विशाल डंभारे आणि पराग दांडगे यांच्यासारख्या चांगल्या सर्पमित्रांमुळेच अशा दुर्मिळ प्रजातीचा शोध पण लागत आहे, आणि त्यांना संरक्षण पण मिळत आहे. ट्रान्झिटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली त्याला त्याच्या अधिवासात सोडायला काही हरकत नाही, असे प्रमाणपत्र दिले आहे. वनपाल अनिरुद्ध खडसे आणि डॉ. सय्यद बिलाल यांच्या नेतृत्वात त्याला त्याच्या अधिवासात सोडण्याची कारवाई करण्यात येत आहे.