ओव्हरफ्लो रामटेकच्या खिंडसीत, फटका मात्र मौद्याच्या बेरडेपारला!
By जितेंद्र ढवळे | Updated: September 29, 2023 16:41 IST2023-09-29T16:39:38+5:302023-09-29T16:41:27+5:30
जलाशयाच्या पाण्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली

ओव्हरफ्लो रामटेकच्या खिंडसीत, फटका मात्र मौद्याच्या बेरडेपारला!
नागपूर : गत आठवड्यात रामटेक तालुक्यातील खिंडसी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. याचा सर्वाधिक फटका मौदा तालुक्यातील बेरडेपार गावाला बसतो आहे. ओव्हरफ्लोचे पाणी बेरडेपार शिवारातील शेतात शिरत असल्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच पाण्यामुळे बेरडेपार गावाचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना याचा फटका बसतो आहे.
जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी केली आहे.गत आठवड्यात खिंडसी जलायश ओव्हरफ्लो झाला. ओव्हरफ्लोचे पाणी मौदा तालुक्यातील अरोलीजवळ असलेल्या बेरडेपार येथे शिरले आहे. गत ४० वर्षांपासून बेरडेपार परिसरातील शेतीला व स्मशान घाटाला जाणारा मुख्य पूल अतिवृष्टी व जलाशयाच्या पाण्यामुळे तुटलेला आहे. याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसतो आहे.
पुराचे पाणी शेतात जमा झाल्याने पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. अनेकदा या ठिकाणी खासदार, आमदार यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही जि.प. सदस्य योगेश देशमुख यांच्यासह येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.