नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपुत्र राकेश सोनटक्के यांना वीरमरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 20:37 IST2019-11-26T20:36:03+5:302019-11-26T20:37:05+5:30
भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांना रविवारी रात्री वीरमरण आले.

नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपुत्र राकेश सोनटक्के यांना वीरमरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (काटोल) : भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांना रविवारी रात्री वीरमरण आले.
आसामच्या डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला २० दिवसांपूर्वी गंभीर जखमी झाली होती. कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी ११.५० वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राकेश यांच्या मृत्यूची बातमी पोहोचताच काटोलच्या पेठबुधवार येथे शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी रुचिता, एक वर्षाचा मुलगा पृथ्वी, आई-वडील आणि दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.
काटोल येथे बुधवारी अंत्यसंस्कार
कोलकाता येथून राकेशचे पार्थिव मंगळवारी रात्री काटोल येथे आणण्यात आले. बुधवारी सकाळी ११ वाजता पेठ बुधवार येथील स्मशानभूमीत राकेशच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती काटोलचे सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे रत्नाकर ठाकरे यांनी दिली.