नरेश डोंगरे, नागपूर: रेल्वेच्या पोलिस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांची पदोन्नतीवर मुंबईला बदली झाली आहे. २०११ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या डॉ. प्रियंका नारनवरे यांचे पती देखिल आयएस अधिकारी असून ते मुंबईत उच्चपदावर कार्यरत आहेत.
डॉ. नारनवरे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ च्या समादेशक म्हणून अडीच वर्षांपासून नागपुरात कार्यरत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे रेल्वे पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून डॉ. नारनवरे यांनी ओळख तयार केली होती. रेल्वे अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्या रात्री बेरात्री कधीही रेल्वे स्थानकावर येऊन येथील बंदोबस्ताची तपासणी करीत होत्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक आंतरराज्यीय टोळ्यांचा छडा लागला आहे. आज शुक्रवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले. त्या आता पदोन्नीतीवर अप्पर पोलिस आयुक्त वाहतूक, बृहन्मुंबई म्हणून रुजू होणार आहेत.