रेल्वे पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी ; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
By नरेश डोंगरे | Updated: January 18, 2025 18:22 IST2025-01-18T18:21:06+5:302025-01-18T18:22:15+5:30
Nagpur : घराजवळच्या चोरट्याने हात मारल्याचा संशय

Railway police officer robbed of valuables worth three lakhs
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरात धाडसी चोरी झाली. एक लाखाची रोकड आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह चोरट्याने अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
फिर्यादी रत्ना निलम डोंगरे (वय ४४) या कोराडीतील शंभूनगर ज्ञानेश्वरी सोसायटीत राहतात. त्यांचे पती निलम डोंगरे लोहमार्ग पोलिसांत (जीआरपी) सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना दोन मुली असून, शुक्रवारी सकाळी छोटी मुलगी कॉलेजला तर पती ड्युटीवर गेले होते. सायंकाळी रत्ना त्यांच्या मोठ्या मुलीसह दुकानात गेल्या होत्या. कॉलेजला जाणारी मुलगी घरी परतेल म्हणून त्यांनी घराच्या दाराची चावी बाजुलाच अडकवून ठेवली. रात्री घरी परतल्यानंतर त्या बेडरूममध्ये गेल्या असता त्यांना लाकडी कपाटाचे नटबोल्ट खाली पडून दिसले. आतमधील कपाटाची पाहणी केली असता सुमारे एक लाख रुपये, आठ ते दहा हजारांची नाणी, दोन मंगळसुत्र, पाच जोड पायपट्टी, नाकातील सोन्याचा खडा आणि पाच चांदीचे सिक्के असा एकूण अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करून पतीला माहिती कळविली. त्यानंतर कोराडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
मुलीच्या शिक्षणासाठी जमा केले होते पैसे
रत्ना यांच्या माहितीनुसार, मुलींच्या शिक्षणासाठी वेळोवेळी लागणारा खर्च भागविण्यासाठी रत्ना यांनी घरात थोडे थोड करून ही रक्कम जमा केली होती. अनेक दिवसांची बचत एका झटक्यात चोरट्याने लंपास केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
परिसरातीलच चोरट्यानेच मारला हात ?
घटनेची वेळ आणि एकूण परिस्थिती बघता ही चोरी परिसरातीलच चोरट्याने केली असावी,असा संशय आहे. फिर्यादी रत्ना डोंगरे यांनी पोलिसांकडे तसा संशय व्यक्त करून एका युवकाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. त्यावरून कोराडी पोलिसांनी संशयीत तरुणाची चाैकशी चालविली आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्याच घरात ही धाडसी चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.