अल्कोहोल आणि कामोत्तेजक जाहिरातीला रेल्वे मंत्रालयाचा ‘रेड सिग्नल’ ‘भडक’ उत्पादनांचे ‘ब्रँडिंग’ बंद : जाहिरात कंपन्यांच्या उत्साहावर पाणी
By नरेश डोंगरे | Updated: March 30, 2026 22:47 IST2026-03-30T22:45:32+5:302026-03-30T22:47:19+5:30
हजारो कोटी खर्च करून भारतीय रेल्वेने एकीकडे आपले नेटवर्क अत्याधुनिक करण्याचा धडाका लावला आहे. दुसरीकडे नॉन फेअर रेव्हेन्यूच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत हजारो कोटींची गंगाजळी ओतण्यासाठीही वेगवेगळे मार्ग निवडले आहे.

अल्कोहोल आणि कामोत्तेजक जाहिरातीला रेल्वे मंत्रालयाचा ‘रेड सिग्नल’ ‘भडक’ उत्पादनांचे ‘ब्रँडिंग’ बंद : जाहिरात कंपन्यांच्या उत्साहावर पाणी
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नशा वाढविणाऱ्या, कामोत्तेजक आणि उत्तानपणा प्रदर्शित करणाऱ्या जाहिरातींवर आता सक्तीचा चाप ओढला जाणार आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून आपल्या ‘भडक’ उत्पादनांचे ब्रँडिंग करणाऱ्या जाहिरातदारांच्या उत्साहावर आता पाणी फेरले जाणार आहे.
हजारो कोटी खर्च करून भारतीय रेल्वेने एकीकडे आपले नेटवर्क अत्याधुनिक करण्याचा धडाका लावला आहे. दुसरीकडे नॉन फेअर रेव्हेन्यूच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत हजारो कोटींची गंगाजळी ओतण्यासाठीही वेगवेगळे मार्ग निवडले आहे. अशातीलच ‘आउट-ऑफ-होम’ जाहिरात धोरणांतर्गत, रेल्वेस्थानकांच्या बाहेरील परिसरात जाहिरात करण्याच्या संधी ‘रेल डिस्प्ले नेटवर्क’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. रोज लाखो प्रवाशांची नजर आपल्या उत्पादनावर पडू शकते, हे ध्यानात घेऊन विविध कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिरात डिजिटल स्क्रीन आणि डिस्प्ले सिस्टीमच्या माध्यमातून करीत असतात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार गाडी आणि डब्यांचाही वापर (आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी) ब्रँडिंग (जाहिरात)साठी करण्यात येतो.
जाहिरातींची सर्व कंत्राटे ऑनलाइन पोर्टलवर ई-लिलावाद्वारे दिली जातात. निवड झालेल्या जाहिरातदारांसाठी कोणकोणते निकष आहेत, त्याची रूपरेषा दिलेली असते. प्रत्येक जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते. तथापि, प्रदर्शनासाठी ‘ब्रँड’ची निवड करण्याचा अधिकार जाहिरात संस्थेचा असतो. त्यामुळे काही ब्रँडचे ‘भडक’ प्रदर्शन होताना दिसते. काही जाहिरातीत उत्तानपणा दिसतो. आता मात्र अशा प्रकारच्या जाहिराती गाडीच्या आत किंवा बाहेर कुठेही दिसणार नाही. कारण रेल्वे मंत्रालयाने अशा जाहिरातींना ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे.
या जाहिरातींना ‘नो चान्स’
अल्कोहोलयुक्त पेयाच्या जाहिराती, अश्लील किंवा कामुक पार्श्वभूमी असलेल्या जाहिराती, वाहतुकीच्या इतर साधनांच्या स्पर्धात्मक जाहिराती, रेल्वे अपघातग्रस्तांना विमा देणाऱ्या खासगी विमा कंपन्यांच्या जाहिराती, सिगारेट, विडी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती.
((कोट))
अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिरातींना रेल्वेत स्थान नाही. आधीपासूनच रेल्वे प्रशासन त्याची काळजी घेते.
-अमन मित्तल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.