नागपुरात सिलिंडर रिफिलिंगच्या अवैध कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:45 AM2018-02-05T10:45:37+5:302018-02-05T10:50:32+5:30

विविध कंपन्यांच्या मोठ्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने वायू (गॅस) काढून ती छोट्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या हिंगण्यातील एका अवैध सिलिंडर रिफिलिंग कारखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा घातला.

Raid on illegal cylinder refilling factory in Nagpur | नागपुरात सिलिंडर रिफिलिंगच्या अवैध कारखान्यावर धाड

नागपुरात सिलिंडर रिफिलिंगच्या अवैध कारखान्यावर धाड

Next
ठळक मुद्देधोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग २९५ सिलिंडर जप्त, आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध कंपन्यांच्या मोठ्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने वायू (गॅस) काढून ती छोट्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या हिंगण्यातील एका अवैध सिलिंडर रिफिलिंग कारखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा घातला. येथून छोटी-मोठी २९५ सिलिंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करून एका आरोपीला अटक केली. शनिवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे हिंगणा- एमआयडीसीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
क्रिष्णकांत वशिष्ठ कुंवर (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील काळमेघनगरात राहतो. त्याचे भारत ट्रेडिंग कंपनी नावाने दुकान आहे. तो स्वत:ला गो-गॅस कंपनी हिंगणा विभागाचा वितरक असल्याचे सांगतो. बाजूलाच त्याचे गोदाम आहे. या गोदामात तो विविध कंपन्यांच्या सिलिंडरमध्ये गॅस पाईप आणि अ‍ॅडॉप्टरच्या माध्यमातून छोट्या (दिल्ली मेड) सिलिंडरमध्ये गॅस भरतो आणि त्याची अवैध विक्री करतो, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.
त्यावरून ठाणेदार सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पी. सयाम, गिरीधर ठवरे, हवलदार विजय नेमाडे, श्यामनारायण ठाकूर, नायक मंगेश गवई अणि अभिजित यांनी शनिवारी रात्री ७ च्या सुमारास कुंवरच्या गोदाम कम कारखान्यावर छापा घातला. त्यावेळी आरोपी मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर याच्याकडून गो गॅसचे ७१, भारत गॅसचे २४ आणि दिल्लीमेड (छोटे) २०० असे एकूण २९५सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.

मोठे रॅकेट कार्यरत ?
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख, ५२ हजार, ३५० रुपये आहे. पोलिसांनी स्फोटक पदार्थ कायदा आणि अन्य कलमासह गुन्हा दाखल करून आरोपी कुंवर याला अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. आरोपी या धोकादायक धंद्यात एकटा नसावा, त्याचे अन्य साथीदारही यात सहभागी असावे, असा संशय आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागू शकते.

आयुक्तांकडे माहिती
रात्री ७ वाजतापासून सुरू झालेली कारवाई मध्यरात्री आटोपून पोलीस रिकाम्या हाताने परत जाण्याच्या तयारीत असल्याचे पाहून एका सतर्क नागरिकाने थेट पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना त्याची माहिती दिली. कारवाईत गोलमाल होण्याची शक्यताही व्यक्त केली. त्याची दखल घेत आयुक्तांनी एमआयडीसीचे ठाणेदार महाडिक यांना विचारणा केली. त्यांना कडक कारवाई करण्याचेही निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी २९५ सिलिंडर जप्त करून ते ठाण्यात आणले. जप्त केलेले हे सिलिंडर ठाण्यात ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे पोलिसांनी पुरवठा विभागाला कारवाईची माहिती देऊन हे सिलिंडर ताब्यात घेण्याची सूचना केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने त्याला नकार दिला. त्यामुळे हे सिलिंडर आता कुठे ठेवावे, असा प्रश्न एमआयडीसी पोलिसांना पडला आहे.

स्फोटकाच्या ढिगाऱ्यावर मोहल्ला
ज्या भागात आपण राहतो, तेथे असा भयावह प्रकार सुरू होता, हे लक्षात आल्याने हिंगणा, एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. आरोपी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गॅस सिलिंडर ठेवून त्यातील गॅस काढून दुसऱ्यात भरत होता. यादरम्यान कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची भीती होती. तसे झाले असते तर हा भाग बेचिराख होऊन मोठ्या प्रमाणावर जानमालाची हानी झाली असती. आरोपी कुंवरने केवळ त्याचे घरच नव्हे तर संपूर्ण मोहल्लाच स्फोटकाच्या ढिगाऱ्यावर ठेवल्यासारखा प्रकार केला होता.

Web Title: Raid on illegal cylinder refilling factory in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे