पुणे पोलिसांचा नागपुरात वकिलाच्या घरी छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:28 IST2018-04-17T20:42:27+5:302018-04-17T22:28:37+5:30
भीमा कोरेगाव दंगलीची चिथावणी दिल्याचा ज्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर संशय आहे, त्या आयोजकांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या विशेष पथकांतीलअधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अॅड. गडलिंग यांच्या घरात तब्बल आठ तास तपासणी केली.

पुणे पोलिसांचा नागपुरात वकिलाच्या घरी छापा

नागपूर : भीमा कोरेगाव दंगलीची चिथावणी दिल्याचा ज्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर संशय आहे, त्या आयोजकांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या विशेष पथकांतीलअधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अॅड. गडलिंग यांच्या घरात तब्बल आठ तास तपासणी केली.
विशेष म्हणजे, अॅड. गडलिंग गेल्या २० वर्षांपासून नक्षलवाद्यांशी संबंधित केसेस लढवतात. नागपूर-विदर्भातील फ्रंटल आॅर्गनायझेशनवर नक्षलविरोधी अभियान तसेच स्थानिक पोलीस अनेक वर्षांपासून नजर ठेवून आहे. गडचिरोली-गोंदियातील एल्गार परिषद तसेच अन्य फ्रंटल आॅर्गनायझेशनने पुणे, मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणी जाळे विणल्याच्या अधून मधून बातम्या येतात. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसाठी जमविण्यात आलेल्या निधीपैकी काही निधी नागपुरातून गेल्याचा संशय आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात उसळलेल्या दंगलीत एल्गार परिषदेने भूमिका वठविल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी काही संबंध आहे का, ते तपासण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक मंगळवारी पहाटे नागपुरात धडकले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अॅड. गडलिंग यांच्या भीम चौकाजवळच्या मंगळवारी बाजार (जरीपटका) येथील निवासस्थानी पहाटे ५ वाजता छापा घातला. तब्बल आठ तास तपासणी केल्यानंतर येथून पोलिसांनी काही कागदपत्रे, सीडीज, हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह ताब्यात घेतले. तब्बल १ वाजेपर्यंत ही कारवाई चालली. कारवाईत व्यत्यय येऊ नये म्हणून अॅड. गडलिंग यांच्या घराच्या चारही बाजूने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपायुक्त सुहास बावचे हेदेखील कारवाई संपेपर्यंत तेथे हजर होते. दरम्यान, ही माहिती कळताच अॅड. गडलिंग यांचे समर्थक, वकील मित्र मोठ्या संख्येत गोळा झाले.
छाप्याची पार्श्वभूमी
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा इथे हिंसाचार उफाळला होता. त्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी ३ जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर, जमावाला भडकाविण्याचा आरोप एल्गार परिषदेच्या आयोजकांवर लावण्यात आला असून ७ जानेवारी २०१८ रोजी कबीर कला मंचच्या चार जणांसह एकूण आठ जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दडपणासाठी छापेमारी
आरएसएस आणि तशी विचारधारा बाळगणारांचे हस्तक बनून पोलीस काम करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून फुले, शाहू, आंबेडकर, पेरियर रामास्वामी, भगतसिंगाच्या विचारधारेवर काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना चिरडण्याचे प्रयत्न होत आहे. ज्यांना अटक केली पाहिजे त्या कोरेगाव भीमाच्या दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडे गुरुजींना सरकार अटक करत नाही. आम्हाला त्रास देण्यासाठी या धाडी मारण्यात येत आहेत, असा आरोप यावेळी अॅड. गडलिंग तसेच वीरा साथीदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. पोलिसांनी माझ्या पुतण्याला परीक्षेला (पेपरला) जाण्यासाठी तसेच माझ्या मित्रांना घरात येण्यासाठी अडसर निर्माण केला, असा आरोप अॅड. गडलिंग यांनी यावेळी केला. या असल्या दडपणाला आम्ही भीक घालणार नाही, असे ते म्हणाले.