लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा
By योगेश पांडे | Updated: November 6, 2025 18:00 IST2025-11-06T17:56:19+5:302025-11-06T18:00:54+5:30
देवेंद्र फडणवीस : राहुल यांचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे लवंगी फटाका

Rahul Gandhi's agenda is to restore public trust in democracy.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्होटचोरीच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मोठा आरोप केला आहे. देशात लोकशाहीत योग्य पद्धतीने नांदू नये यासाठी काही जागतिक तत्व प्रयत्नरत असतात. त्यांचा अजेंडा व राहुल गांधींचे काम एकत्रितपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या लोकशाही व त्यातील संस्थांवरून जनतेचा विश्वास उठला पाहिजे असे दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधी ज्यावेळेस हायड्रोजन बॉम्ब म्हणतात तेव्हा तो लवंगी फटाका असतो हे सर्वांना लक्षात आले आहे. त्यांनी मॉर्फ केलेले फोटो दाखविले असल्याचा काही वाहिन्यांनीच दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्यातील फोलपणा समोर आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्यावरूनदेखील टीका केली. उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना संकट आले असताना कार्पेटवरून खाली उतरले नव्हते. सततच्या पराभवानंतर लोकांमध्ये जावे लागते हे त्यांच्या लक्षात आले आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ते आल्याचे शेतकऱ्यांना माहिती आहे. सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. त्यामुळे ठाकरे यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही ठिकाणी पॅकेज पोहोचलेले नाही व त्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार दररोज ६०० कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतात. म्हणून पॅकेजला वेळ लागत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पार्थ पवार आरोप प्रकरणाची सखोल चौकशी करणार
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागविली आहे. यासंदर्भातील योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या आधारावर यासंदर्भात पावले उचलू. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती घेऊनच बोलेन. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाही. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. जर अनियमितता असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.