Nagpur Crime News: नागपूरमधील कन्हान नदीत उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती शेजारी उभा असतानाच महिलेने नदी उडी मारली. पतीने मदतीसाठी आरडाओरड केली, पण मदत मिळेपर्यंत महिलेचा मृत्यू झाला. उडी मारण्यापूर्वी पती आणि पत्नीने सोबत सेल्फी घेतला होता, तो आता समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्ञानेश्वर विजय साकोरे (वय २३) असे नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महिला मूळची रामटेक तालुक्यातील काचूरवाहीचे आहेत. पती विजय साकोरे आणि ज्ञानेश्वरी साकोरे हे सध्या नागपूरमधील मानेवाडा भागात राहत होते.
पुलावर कार थांबवली, नदीत निर्माल्य टाकलं अन्...
ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. साकोरे दाम्पत्य कारने काचूरवाही गावाकडे निघाले होते. दरम्यान, त्यांनी कन्हान नदीवर असलेल्या नेरी पुलावर कार थांबवली. पूजेचे निर्माल्य टाकण्यासाठी विजय साकोरेंनी कार थांबवली होती.
वाचा >>जगाचा शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही
ज्ञानेश्वरी आणि विजय साकोरे कारमधून उतरले. त्यांनी निर्माल्य नदीत टाकले. त्यानंतर काही वेळ त्यांनी पुलावरच घालवला. विजय साकोरेंनी एक सेल्फीही घेतला. मात्र, त्यानंतर काही क्षणातच ज्ञानेश्वरी यांनी नदीत उडी मारली.
विजय साकोरेंना काही कळायच्या आतच ज्ञानेश्वरी साकोरे नदी पडल्या. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. पण, जवळपास कुणी नसल्याने मदत मिळाली नाही. नवीन कामठी पोलिसांना उशिराने या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शनिवारी नदीत उडी, रविवारी सापडला मृतदेह
शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वरी यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली. पोलीस सायंकाळपर्यंत तिथे पोहोचले. शोध सुरू करण्यात आला. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर रविवारी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले. बराच शोध घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी साकोरे यांचा मृतदेह सापडला. ज्ञानेश्वरी यांनी आत्महत्या का केली, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.