लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामधील लोहारडोंगरी येथे मंजूर करण्यात आलेल्या लोह खनिज खाणीविरोधातील प्रकरणामध्ये सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारसह इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस जारी करून येत्या एक महिन्यामध्ये या खाणीची वैधता सिद्ध करण्याचा आदेश दिला. विकास प्रकल्पांकरिता पर्यावरणाचे नुकसान व्हायला नको, असे मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले.
या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने या खाणीसंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे. याशिवाय, पर्यावरणप्रेमी बंडू धोत्रे व योगेश्वर दुधपचारे यांनीही स्वतंत्र जनहित याचिकेद्वारे या खाणीला आव्हान दिले आहे. राज्य सरकारने राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीचा विरोध डावलून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील वन्यजीव क्षेत्रामध्ये या खाणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ६० वाघांसह इतर वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताडोबा-अंधारी ते उमरेड-कन्हांडला या वाघांची घनता असलेल्या जंगलांना जोडणाऱ्या मार्गिकेत ही खाण येते. तज्ज्ञांच्या समितीने ही खाण जंगलात होऊ नये असा अहवाल दिला होता. त्यानंतरही खाण मंजूर करण्यात आली. खाण परिसरातच आठ वाघ आहेत.
या प्रकल्पामुळे सुमारे १८ हजारांहून अधिक झाडेसुद्धा तोडली जाणार आहेत. अॅड. गोपाल मिश्रा यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, दुसऱ्या जनहित याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे व अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी कामकाज पाहिले. अनुसूची एकमधील इतरही प्राण्यांचे वास्तव्य याठिकाणी आहे. वाघांना आश्रय देणारी शेलारी, साजा, बीजा, हेदू, भिर्रा आणि निर्माळीची झाडे आहेत.
Web Summary : Nagpur High Court demands justification for the Loharadongri iron ore mine in Chandrapur, amid environmental concerns. The court seeks validation from central and state governments within a month, highlighting potential harm to wildlife, including tigers in the Tadoba-Andhari Tiger Reserve, and deforestation.
Web Summary : नागपुर उच्च न्यायालय ने चंद्रपुर में लोहरडोंगरी लौह अयस्क खदान की वैधता पर स्पष्टीकरण मांगा। अदालत ने केंद्र व राज्य सरकार को एक महीने में जवाब देने को कहा है, क्योंकि इससे ताडोबा-अंधारी बाघ अभ्यारण्य के वन्यजीवों और वनों को नुकसान हो सकता है।