शंभरावर पोलिस, आरपीएफ जवानांच्या ताफ्यासमोर विरोध ! तणावादरम्यान मोतीबागमधील अतिक्रमण केले उध्वस्त
By नरेश डोंगरे | Updated: December 20, 2025 20:17 IST2025-12-20T20:14:40+5:302025-12-20T20:17:14+5:30
Nagpur : नागपूर - राजनांदगाव रेल्वे मार्गावरच्या नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक ते मोतीबाग दरम्यान सुमारे ३.५ किलोमिटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

Protest in front of a convoy of over a hundred police and RPF personnel! Encroachments in Moti Bagh demolished amid tension
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रचंड विरोध, आक्रोश अन् तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोतीबाग परिसरातील अतिक्रमण ध्वस्त केले. विरोध मोडून काढण्यासाठी रेल्वेने आपल्या यंत्रणांसह स्थानिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त उभा केला होता.
नागपूर - राजनांदगाव रेल्वे मार्गावरच्या नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक ते मोतीबाग दरम्यान सुमारे ३.५ किलोमिटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या मार्गाच्या समांतर दपूम रेल्वेच्या जमिनीच्या हद्दीत १४५ अतिक्रमणकारी असल्याने रेल्वेच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. हे अतिक्रमण खाली व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. २० ते ३० वर्षांपासून भीम रत्न नगरात राहत असल्याने संबंधित रहिवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा दुर्लक्षित होत असल्याची भावना असल्याने अतिक्रमण धारकांनी रेल्वेची जमीन सोडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तर, जागा रिकामी करून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार, वारंवार नोटीस, पब्लिक अनाऊंसमेंट वगैरेची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती.
२० डिसेंबरला अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार, आज सकाळपासून या भागात १०० पेक्षा जास्त शहर शहर पोलिस दलाचे कर्मचारी, १० रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान, ३० अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी, तसेच वैद्यकीय व विद्युत विभागाचा ताफा तैनात करण्यात आला होता. कारवाईसाठी ३ जेसीबी यंत्रे आणि १ पोकलेन (एक्स्काव्हेटर) मशीन वापरण्यात आली. तरुणांचे वृद्ध आणि लहानांचे मोठे झालेल्या अनेक रहिवाशांनी या कारवाईच्या विरोधात आरडाओरड, विरोध केला. त्यामुळे काहीशी तणावाचीही स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्याला न जुमानता १६० मीटर परिसरातील ३२ पक्की अतिक्रमणे पाडण्यात आली.
शिल्लक अतिक्रमणधारकांना ईशारा
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत अतिक्रमित १४५ पैकी ३२ पक्की घरे आणि झोपड्या पाडण्यात आल्या. मात्र, रेल्वेच्या जमिनीवर आणखी ११३ अतिक्रमणे शिल्लक आहेत. संबंधित व्यक्तींना आजच्या कारवाईनंतर लवकरात लवकर ही जागा रिकामी करून देण्याचे बजावण्यात आले आहे. तसे न झाल्यास अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.