नागपूरहून पुणे व मुंबईसाठी स्लीपर वंदे भारतचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:49 IST2025-01-09T16:47:13+5:302025-01-09T16:49:13+5:30

'डीआरएम' विनायक गर्ग : प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य

Proposal for sleeper Vande Bharat from Nagpur to Pune and Mumbai | नागपूरहून पुणे व मुंबईसाठी स्लीपर वंदे भारतचा प्रस्ताव

Proposal for sleeper Vande Bharat from Nagpur to Pune and Mumbai

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर:
नागपूरवरून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे सेवाग्राम, विदर्भ, दुरांतो, नागपूर-पुणे, गरीबरथ या गाड्यांमध्ये नेहमीच वेटींगची स्थिती पाहावयास मिळते. त्यासाठी नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे दरम्यान स्लीपर वंदे भारत चालविण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त 'डीआरएम' विनायक गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.


विनायक गर्ग यांनी नुकताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी डीआरएम कार्यालयातील समाधान सभागृहात संवाद साधला. ते म्हणाले, मध्य रेल्वेतील नागपूर विभाग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. येथून चारही दिशांना १२५ च्या वर रेल्वेगाड्या धावतात. विभागात नागपूरसह अजनी, सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतुल अशी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. त्यामुळे आगामी काळात अधिकाधिक सुरक्षा आणि सुविधा पुरवून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे कर्मचारी रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी प्राधान्यक्रमाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. रेल्वेत अधिकृत व्हेंडरचा बंदोबस्त करण्यासाठी व्हेंडर्सना क्यूआर कोड देऊन त्यांच्यासाठी व्हीएमएस अॅप तयार करण्यात आले आहे. यामुळे अधिकृत व्हॅडर्सचा डाटा व्हेरिफिकेशन करणे सोयीचे झाले आहे. भाविकांसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन, दीपावली, छठपूजा, ताजुद्दीन बाबा उरूस, महापरिनिर्वाण दिन, कुंभमेळा आदींसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच प्रवाशांसाठी संजीवनी फार्मसी उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासात रुग्णाला ३ मिनिटात डॉक्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर-सेवाग्राम, बल्लारशा थर्ड लाईनचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले, विभागात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक कृष्णात पाटील, 'एडीआरएम (प्रशासन) पी. एस. खैरकर, 'एडीआरएम' (तांत्रिक) रुपेश चांदेकर, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी सांझी जैन, गतिशक्ती युनिटचे (निर्माण) मुख्य प्रकल्प अधिकारी पवन पाटील, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार उपस्थित होते. 


सव्वा वर्षात नागपूर रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण
नागपूरला वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानक बनविण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे आगामी एक ते सच्या वर्षात पूर्ण होऊन नागपूर वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानक होणार असल्याची माहिती डीआरएम गर्ग यांनी दिली. त्यानंतर रेल्वेस्थानकावर पार्किंगची सुविधा वाहून प्रवाशांच्या संख्येतही वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


रिद्धपूर रेल्वेस्थानकाचे काम वर्षभरात
महानुभाव पंथांच्या दृष्टीने रिद्धपूर येथे दोन मेमू गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. आगामी वर्षभरात रिद्धपूर रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने विकासकामे सुरू असल्याची माहिती 'डीआरएम' गर्ग यांनी दिली.


३०० रेल्वे इंजिनमध्ये बायो-टॉयलेट
नागपूर विभागात ३०० रेल्वे इंजिन कार्यरत आहेत. या रेल्वे इंजिनमध्ये बायो टॉयलेट सुरू करण्याचे विचाराधीन असून त्यानुसार योजना आखण्यात आली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. हे बायो-टॉयलेट सुरु झाल्यानंतर महिला लोकोपायलटला प्रवासात सुविधा होणार आहे.

Web Title: Proposal for sleeper Vande Bharat from Nagpur to Pune and Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.