नागपुरात प्रॉपर्टीचा वाद विकोपाला, ८७ वर्षीय काकाने पुतण्यावर चालविली गोळी
By योगेश पांडे | Updated: December 24, 2025 15:36 IST2025-12-24T15:34:31+5:302025-12-24T15:36:05+5:30
Nagpur : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यानंतर काका व पुतण्यात जोरदार झटापट झाली. यातच ८७ वर्षीय काकाने पुतण्यावर गोळी चालविली.

Property dispute escalates in Nagpur, 87-year-old uncle shoots nephew
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यानंतर काका व पुतण्यात जोरदार झटापट झाली. यातच ८७ वर्षीय काकाने पुतण्यावर गोळी चालविली. या प्रकारामुळे हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव परिसरात खळबळ उडाली होती. काका, पुतण्या व पुतण्याचा मित्र यात जखमी झाले.
नाना जगन्नाथ देवतळे (८७, गुमगाव) असे काकाचे नाव आहे. तर प्रवीण चंद्रकांत देवतळे (४२) हा पुतण्या आहे. नाना व प्रवीणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. अनेकदा त्यांच्यात भांडणे झाली होती. बुधवारी त्याच मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला व काही वेळातच शिवीगाळीची जागा धक्काबुक्कीने घेतली. प्रवीणसोबतच त्याचा मित्र विजय मारावार (३५) हादेखील होता. प्रवीणने काकावर फावड्याने हल्ला करत जखमी केले. हे पाहून संतापलेल्या नानाने स्वत:जवळच्या बंदुकीने धाक दाखविला. प्रवीण व विजयने काकाला पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र झटापटीत बंदुकीतून दोन गोळ्या चालल्या. एक गोळी प्रवीणच्या पाठीत लागली तर एक गोळी विजयच्या हाताला लागली. गोळीचा आवाज ऐकून वस्तीतील लोकांनी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली व तातडीने तिघांनाही दवाखान्यात नेले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केली. नानाला हिंगणा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रवीण व विजयविरोधात बुटीबोरीतील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.