थकीत रकमेचा ४८ हप्त्यांचा शब्द; दोनच हप्त्यांत झाले बंद ! एसटी कामगारांची उपेक्षा
By नरेश डोंगरे | Updated: February 7, 2026 19:30 IST2026-02-07T19:28:58+5:302026-02-07T19:30:08+5:30
Nagpur : आंदोलने आणि वारंवार शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य शासनाने एसटी कामगारांना थकीत पगारवाढीची रक्कम ४८ हप्त्यांत देण्याचे मान्य केले; मात्र दोन हप्त्यांनंतरच हात आखडता घेत ते बंद केले.

Promise of 48 installments for outstanding amount; Closed in just two installments! Neglect of ST workers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंदोलने आणि वारंवार शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य शासनाने एसटी कामगारांना थकीत पगारवाढीची रक्कम ४८ हप्त्यांत देण्याचे मान्य केले; मात्र दोन हप्त्यांनंतरच हात आखडता घेत ते बंद केले. यामुळे राज्यातील एसटी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
एसटी कामगारांचे वर्ष २०२० ते २०२४ या कालावधीतील ६,५०० रुपयांच्या पगारवाढीची थकबाकी मिळवण्यासाठी एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली. त्यासाठी आंदोलने झाली आणि शासनाने शिष्टमंडळाची चर्चा देखील केली. या पार्श्वभूमीवर थकीत रक्कम एकमुश्त न देता ४८ हप्त्यात देण्याचे शासनाने ऑक्टोबर २०२५ मध्ये मान्य केले होते.
त्यानुसार नोव्हेंबर २०२५ पासून थकीत रक्कम देणे सुरू झाले. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत एसटीच्या कामगारांना वेतनात ही रक्कम मिळाली. मात्र, जानेवारी पेड इन फेब्रुवारीचे वेतन ६५०० चा हप्ता वगळून देण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने दिल्यामुळे या महिन्याच्या पगारात थकीत वेतनवाढीचा हप्ता मिळालेला नाही. अनेक वर्ष ज्यासाठी आवाज उठविला तो असा दोनच हप्त्यात बंद करण्यात आल्याने एसटी कामगारांत रोष निर्माण झाला आहे.
मंत्री म्हणतात...
या संबंधाने एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत चर्चा केली असता मंत्री सरनाईक यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना 'शासनाकडे आम्ही ४०० कोटी आणि १२० कोटी रुपये मिळावे म्हणून दोन फायली पाठविल्या. त्यापैकी ४०० कोटी मंजूर होऊन आले आहेत. मी स्वतः मंगळवारी कॅबिनेटमध्ये उर्वरित रक्कम मंजूर करून घेतो व फरकाचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना देतो', असे सरनाईक यांनी सांगितल्याचे एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे.
रविवारी संघटनेची बैठक
रविवारी ८ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एसटी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून, या बैठकीत हा मुद्दा मुख्यत्त्वाने चर्चेला येणार आहे. बैठकीतच यासंबंधाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी दिली आहे.