आजच्या राजकारणातील नीतीमूल्ये हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:53 AM2019-08-19T11:53:56+5:302019-08-19T11:54:27+5:30

आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.

The principles of politics have been lost today | आजच्या राजकारणातील नीतीमूल्ये हरविली

आजच्या राजकारणातील नीतीमूल्ये हरविली

googlenewsNext
ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शंकरराव, राजारामबापू व अण्णाभाऊ जन्मशताब्दी व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंकरराव असो, यशवंतराव असो, जुन्या नेत्यामधील मूल्याधिष्ठित, नीतीमत्ता आज आठवली व अनुसरली जाते. आजच्या राजकारणात ती राहिली नाही. रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व हद्दपार झाले आहेत. आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्यावतीने शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भावे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात अध्यक्षस्थानी गिरीश गांधी, चंद्रकांत वानखडे, कवी डॉ. सागर खादीवाला, अनंतराव घारड, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाकांत अग्निहोत्री, पत्रकार श्रीकांत बेनी आदी उपस्थित होते. मधुकर भावे पुढे म्हणाले, इतिहासात डोकावून बघितल्यास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व विलासराव देशमुख या चार खांबावर महाराष्ट्र राज्य उभे असल्याचे दिसेल. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात तब्बल ३६ धरणे बांधली आहेत. खºया अर्थाने अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागविली. जायकवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाचा विरोध असताना अधिकाऱ्यांना पाठविण्यापेक्षा त्यांनी स्वत: जाऊन बाजू मांडली व धरण मंजूर करून घेतले. आज हे धरण महाराष्ट्राची शान आहे.
विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पालाही त्यांनी मजबुती दिली. दुसरीकडे राजारामबापू पाटील यांनीही जनतेसाठी प्रचंड कष्ट उपसले, शेतकऱ्यांसाठी पदयात्रा काढल्या. दुष्काळी भागात नळयोजना आणली. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला तोड नाही. प्रबोधन साहित्याच्या माध्यमातून दलित, शोषितांचे दु:ख त्यांनी जगासमोर मांडले. ते हे करू शकले कारण त्यांच्या नीतीमत्ता होती. लोकहितासाठी त्यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवला. या तीन सुपुत्रांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण केली, अशी भावना मधुकर भावे यांनी व्यक्त केली. शंकरराव चव्हाण यांचे म्हणणे तत्कालीन प्रमुखांनी ऐकले असते तर कदाचित शीख दंगली आणि बाबरी विध्वंस झाला नसता, असा उल्लेख त्यांनी केला.
गिरीश गांधी यांनी राजारामबापू व शंकरराव चव्हाण यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक चंद्रकांत वानखडे यांनी केले. संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. रेखा दंडिगे-घिया यांनी आभार मानले.

Web Title: The principles of politics have been lost today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.