नागपूर जिल्ह्यात प्राचार्य अडकले एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 22:43 IST2019-10-17T22:40:31+5:302019-10-17T22:43:21+5:30
शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्राचार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहात अटक केली.

नागपूर जिल्ह्यात प्राचार्य अडकले एसीबीच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : विद्यार्थ्यांना तासिकेप्रमाणे शिकविणाऱ्या शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्राचार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहात अटक केली. पगार काढण्यासाठी त्याने शिक्षकाला एक हजार रुपयांची मागणी केली होती. ही कारवाई सावनेर शहरातील आयटीआयमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सुभाष शिवण्णा पेदापल्लीवार (५६, रा. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव आहे. ते सावनेर शहरातील शासकीय आयटीआयमध्ये प्राचार्य असून, या आयटीआयमध्ये १५ दिवसांपूर्वी एक शिक्षक रुजू झाले. त्यांना तासिकेप्रमाणे क्राफ्ट निदेशक रविकिरण रुशिया यांच्या मार्फत दिले जाते. त्यांचा १५ दिवसांचा ७,८७५ रुपये पगार थांबविण्यात आला होता. पगाराची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांनी सुभाष पेदापल्लीवार यांना विनंती केली. या कामासाठी पेदापल्लीवार यांनी त्यांना एक हजार रुपयांची मागणी केली.
त्यामुळे शिक्षकाने गुरुवारी (दि. १०) या प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली. त्यामुळे ‘एसीबी’चे पथक चार दिवसांपासून सुभाष पेदापल्लीवार यांच्या मागावर होते. दरम्यान, ‘एसीबी’च्या पथकाने गुरुवारी सायंकाळी आयटीआय परिसरात सापळा रचला होता. सुभाष पेदापल्लीवार हे त्यांच्या केबिनमध्ये शिक्षकाकडून लाच स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई ‘एसीबी’च्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश बुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात ‘एसीबी’चे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सुनील कळंबे, दिनेश शिवले, शालिनी जांभूळकर, सुशील यादव, नरेंद्र चौधरी, राजेश बन्सोड यांच्या पथकाने केली.