भांडेवाडी डंपिंग यार्डचे प्रदूषण रोखा
By Admin | Updated: November 9, 2014 00:50 IST2014-11-09T00:50:35+5:302014-11-09T00:50:35+5:30
भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे पसरत असलेले प्रदूषण आणि दुर्गंधीच्या समस्येसाठी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी डंपिंग यार्ड परिसरात धरणे आंदोलन केले.

भांडेवाडी डंपिंग यार्डचे प्रदूषण रोखा
नागरिकांचे आंदोलन : उमेश चौबेंनी जाणून घेतल्या समस्या
नागपूर : भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे पसरत असलेले प्रदूषण आणि दुर्गंधीच्या समस्येसाठी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी डंपिंग यार्ड परिसरात धरणे आंदोलन केले.
प्रदूषण आणि घाणीची माहिती घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे पीडित नागरिकांच्या आग्रहास्तव डंपिंग यार्ड परिसरात गेले. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर गुरव, नरेश निमजे, अविनाश निमकर, मनोहर पराते होते. यावेळी वस्तीतील त्रस्त नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांनी सांगितले की, डंपिंग यार्डचा कचरा साफ करणारा कारखाना महापालिकेसाठी समस्या झाला आहे. कारखान्यात दोन वेळा आग लागून तो बंद पडला आहे. परिसरात माती मिळविलेला कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे सर्वत्र धूर पसरतो. रस्त्यावरील लाईट बंद पडले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विविध हॉस्पिटलमधील कचरा, मांस, हाडे, मांसाचे गोळे जाळण्याची व्यवस्था असल्यामुळे वस्तीतील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याच परिसरात शहरातील मोकाट कुत्रे पकडून सोडण्यात येतात. त्यामुळे परिसरात कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक भयग्रस्त झाले आहेत. ते मेलेली जनावरे रस्त्यावर, वस्तीत आणतात. येथे मल शुद्धीकरण केंद्र चालते. त्याची क्षमता कमी असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डेंग्यू, दम्याचा आजार पसरत आहे. यावेळी परिसरात चुकीच्या वेळी वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे पाहून उमेशबाबू चौबेंनी तेथेच धरणे आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच महापौर आणि त्यांची चमू पोलिसांसह तेथे पोहोचली. त्यांनी नागरिकांना समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भांडेवाडीच्या प्रकल्पाला उमरेड रोडवरील पाचगाव येथे स्थानांतरित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान महापौरांनी भांडेवाडी डंपिंग यार्डमधील प्रदूषणाबाबत १० नोव्हेंबरला बैठक आयोजित केली आहे.
धरणे आंदोलनात सचिन काळबांडे, किशोर सोनवणे, नरेश ठाकरे, शेख मुश्ताक, केशव चौधरी, रंजित राऊत, मो. जलील, सुरेश रोकडे, विकास बादलवार, जयप्रकाश भरडकर, नरेंद्र बर्वे, मंगला भागवतकर, नंदा गुमगावकर, दुर्गा चव्हाण आदींनी महापौरांपुढे आपल्या समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)