प्रवीण दटकेच राहणार नागपूर शहराध्यक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:11 IST2019-12-23T22:10:48+5:302019-12-23T22:11:53+5:30
डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असतानादेखील अद्यापही सर्व ‘बूथ’ समितींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराध्यक्षांची निवडदेखील खोळंबली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दटके हेच शहराध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

प्रवीण दटकेच राहणार नागपूर शहराध्यक्ष?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर संघटनात्मक मजबुतीसाठी भाजपाकडून ‘बूथ’ समितीच्या निवडणुका लावण्यात आल्या. १० डिसेंबरपर्यंत या निवडणूका संपून नवीन शहराध्यक्षांची निवड होईल असा अंदाज होता. परंतु डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असतानादेखील अद्यापही सर्व ‘बूथ’ समितींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराध्यक्षांची निवडदेखील खोळंबली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दटके हेच शहराध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
भाजपमध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. संघटन पर्वांमध्ये जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावे घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निश्चित झाले. २१ नोव्हेंबर रोजी नागपुरात भाजपाची संघटनात्मक बैठक झाली होती. यात नागपुरातील ‘बूथ’पातळीवरील निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. २२ नोव्हेंबरपासून ‘बूथ’ पातळीवरील निवडणुकांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत मंडळाच्या निवडणुका पूर्ण होतील असे वेळापत्रक होते. तर १० डिसेंबरपर्यंत नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार होते.
शहरात २ हजार ६५ ‘बूथ’ आहेत. त्यापैकी १८०० ‘बूथ’पातळीवर निवडणूका झाल्या आहेत. परंतु मध्य नागपुरातील मुस्लिमबहुल, उत्तर नागपुरातील अनुसूचित जाती-जमातीबहुल तसेच दक्षिण व पूर्व नागपुरातील मुस्लिमबहुल ‘बूथ’वर अद्यापही नियुक्ती झालेली नाही. येथे थोडी फार अडचण येत आहे. त्यामुळे वेळापत्रक काहीसे गडबडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी १० दिवस प्रतीक्षाच
यासंदर्भात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता वेळापत्रक गडबडले असल्याचे त्यांनी मान्य केले. काही भागात ‘बूथ’ पातळीवर काही अडचणी आहेत. परंतु येत्या आठवड्यात तेथे नियुक्ती होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना विचारणा केली असता त्यांनी हिवाळी अधिवेशनामुळे नियुक्ती थोड्या रखडल्या असल्याचे सांगितले. मात्र पुढील १० दिवसांत भाजपच्या शहराध्यक्षांची निश्चित निवड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.