प्रथमेशने सायकलने कापले २३ तासात ५०१ किमीचे अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 11:25 AM2021-08-24T11:25:41+5:302021-08-24T11:59:15+5:30

Nagpur News रक्षाबंधनाला बहिणींना स्वकर्तृत्वाची भेट देण्यास उत्सुक असलेल्या रामटेकच्या १७ वर्षीय प्रथमेश किंमतकर या युवकाने आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ५०१ किलोमीटरचे अंतर सायकलने कापले.

Prathamesh covered a distance of 501 km in 23 hours on bicycle | प्रथमेशने सायकलने कापले २३ तासात ५०१ किमीचे अंतर

प्रथमेशने सायकलने कापले २३ तासात ५०१ किमीचे अंतर

Next
ठळक मुद्देरक्षाबंधनाला पर्यावरण रक्षणाचा संदेश१७ व्या वर्षी बहिणींना दिली कर्तृत्वाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रक्षाबंधनाला बहिणींना स्वकर्तृत्वाची भेट देण्यास उत्सुक असलेल्या रामटेकच्या १७ वर्षीय प्रथमेश किंमतकर या युवकाने आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ५०१ किलोमीटरचे अंतर सायकलने कापले.

बाराव्या वर्गात शिकत असलेल्या रामटेकच्या प्रथमेश किंमतकर या युवकाला सायकल चालविण्याची प्रेरणा घरातूनच मिळत आहे. या वर्षी रक्षाबंधनाचा सोहळा अविस्मरणीय ठरावा आणि आर्या, श्रेया, राधा व मुग्धा या आतेबहिणींना स्वकर्तृत्वाची भेट द्यावी, या हेतूने त्याने रामटेक-मुक्तागिरी (परतवाडा)-रामटेक असे ५०१ किमीचे अंतर एकट्यानेच सायकलद्वारे कापून नवा विक्रम स्थापित करण्याचा प्रण केला. हा विक्रम २४ तासात पूर्ण करायचा होता. त्या अनुषंगाने त्याने रामटेक (रामगिरी) येथून अठराभूजा गणपतीला साकडे घालत सकाळी ७.२० वाजता त्याने आपल्या सायकलवारीस प्रारंभ केला. या प्रवासात त्याने मनसर, कन्हान, नागपूर, कोंढाळी, कारंजा, तळेगाव, मोझरी, अमरावती, परतवाडा, मुक्तागिरी हे २५० किमीचे अंतर रात्री ८ वाजता पूर्ण केले. तेथे जराशा विश्रांतीनंतर तो पुन्हा रामटेकच्या दिशेने निघाला आणि २२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता रामटेक येथे पोहोचला. दोन्ही अंगाचे ५०१ किमीचे अंतर त्याने २३ तासात पूर्ण केले. यात विश्रांती, चहा, पाणी, नाश्त्याचा वेळेचा समावेश नाही.

विक्रम रचला

१७ वर्षे वयोगटात ५०० किमीचे अंतर सायकलने कापण्याचा कुणाचाही विक्रम नव्हता. तो विक्रम आता प्रथमेशने प्रस्थापित केला आहे. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेने या विक्रमाची नोंद केली आहे. या संपूर्ण विक्रमाची नोंद स्रव ॲपद्वारे मुव्हिंग टायमिंगने मोजण्यात आले आणि या प्रवासाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ३० ऑगस्टला तो वयाची १७ वर्षे पूर्ण करणार आहे.

बाबांनी वाढविला उत्साह

या संपूर्ण प्रवासात प्रथमेशचे वडील ऋषिकेश, आई डॉ. अंशुजा, लहान भाऊ अभंग व कौटुंबिक मित्र रवी माथुरे फोर व्हीलरने सोबतीला होते. परतीच्या प्रवासात प्रथमेशला पहाटे ४ वाजताच्या सुमारास ग्लानी येत असल्याचे दिसताच ऋषिकेश यांनी स्वत: कारला लटकलेली दुसरी सायकल घेतली आणि सोबतीला चालविण्यास सुरुवात केली. बाबांनी वाढविलेल्या या उत्साहाने प्रथमेशने जोशात हा विक्रम रचला. नागपुरात गिट्टीखदान येथे प्रथमेशचे स्वागत डॉ. अशोक ढोबळे व चेतन कवाळते यांनी केले.

अभंगही रचणार विक्रम

प्रथमेशचा हा पराक्रम बघून दहा वर्षीय लहान भाऊ अभंग यानेही सलग १२ तास सायकल चालविण्याचा विक्रम रचण्याची तयारी सुरू केली आहे.

..............

Web Title: Prathamesh covered a distance of 501 km in 23 hours on bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.