"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:00 IST2024-12-15T14:50:57+5:302024-12-15T15:00:43+5:30
नागपुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली.

"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी
Praful Patel on Ajit Pawar : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालात वेगळं चित्र पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला ५० जागांचाही आकडा गाठता आला नाही. लाडकी बहीण योजनेच्या यशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे विजयानंतर अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाल्याचे कबुल केलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लाडकी बहीण योजनेवरुन अजित पवार यांना मिश्किल टोला लगावला आहे.
नागपुरात मंत्रिमंडळ विस्ताराआधी राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. तसेच विरोधकांवरही टीकास्त्र डागलं. अजित पवार सर्वात कंजूस अर्थमंत्री असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
"लाडकी बहीण योजनेमुळे हा यशाचा दिवस आपल्याला साजरा करता येत आहे. याच्यामागे अजितदादांचे काम होतं. राज्यात ही योजना दोन महिन्यांमध्ये बंद होऊन जाईल असं विरोधक म्हणत होते. बहिणींनी खात्यात आलेले पैसे लवकरात लवकर काढून घेतले पाहिजे, असं सांगत होते. पण अडीच कोटी महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे निवडणुकीआधी जमा झाले होते. पण यासंदर्भात कुठलीही तक्रार नव्हती. आम्ही कुठल्याही गावात गेलो की सर्वजण पैसे मिळाले असे सांगायचे. सगळेजण तिजोरी खाली असून पैसे कुठून येणार असं म्हणत होते. अनेक लोक दिल्लीतही शंका बाळगायचे. मी तुम्हाला सांगतो सगळ्या भारतामध्ये सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर ते अजितदादा आहेत. कंजूस म्हणजे चांगल्या भावनेने म्हणतो आहे. पैसा वाया जाऊ देणार नाही. जे पैसे जिथे पोहोचायचे आहेत तिथे पोहोचवण्याचे काम अजित पवार करतात. पण महाराष्ट्राच्या तिजोरीवर कधीही कोणी डोळा ठेवला तर त्याला हात लावू देणार नाही. असा यशस्वी अर्थमंत्री म्हणजे अजितदादा आहेत. त्यामुळे कोणी काही चिंता करू नका," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावरुन तिढा
नागपुरात आज मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावरुन तिढा निर्माण झाला आहे. अर्थमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न सातत्याने प्रयत्न करत होतं. त्यामुळे गेल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवारांना पुन्हा संधी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. त्यानंतर आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अर्थमंत्रीपद कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.