सिव्हील लाइन्समध्ये दर रविवारी दिसतो ‘स्वच्छता दूत’; डॉक्टरांची अनोखी मोहिम : शहर स्वच्छतेचा संकल्प
By गणेश हुड | Updated: November 20, 2025 21:16 IST2025-11-20T21:15:20+5:302025-11-20T21:16:04+5:30
रविवारी सकाळी डॉ. निर्भय स्वच्छतेच्या सेवेला सुरुवात करतात. सिव्हील लाइन्समधील बोले पेट्रोल पंप ते तिरपुडे महाविद्यालयापर्यंत १०० मीटर परिसरातील कचरा उचलतात.

सिव्हील लाइन्समध्ये दर रविवारी दिसतो ‘स्वच्छता दूत’; डॉक्टरांची अनोखी मोहिम : शहर स्वच्छतेचा संकल्प
- गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारची निवांत सकाळ… बहुतेक जण अजूनही आळस झटकत घरात असतात. पण सिव्हील लाइन्समध्ये मात्र दर रविवारी एक वेगळीच चाहूल लागते. हातात ग्लोव्हज, कचरा उचलण्याची काठी आणि एक पिशवी घेऊन एक व्यक्ती शांतपणे रस्त्याकडेला पडलेला कचरा गोळा करताना दिसते. कोणतंही कौतुक नको, फोटो नाही, व्हिडिओ नाही… फक्त शहराची स्वच्छता आणि नागपूरप्रती असलेला निःस्वार्थ भाव.ही व्यक्ती म्हणजे मध्य रेल्वेमध्ये कार्यरत डॉ. कुमार निर्भय. पेशाने डॉक्टर आहेत. पण ‘स्वच्छतादूत’ बनले आहेत.
रविवारी सकाळी डॉ. निर्भय स्वच्छतेच्या सेवेला सुरुवात करतात. सिव्हील लाइन्समधील बोले पेट्रोल पंप ते तिरपुडे महाविद्यालयापर्यंत १०० मीटर परिसरातील कचरा उचलतात. रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, फुटलेल्या काचा, बहुतेक लोक ज्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करतात, तोच कचरा ते दर आठवड्याला एकट्याने गोळा करून कचराकुंडीत टाकतात.
त्यांच्या कृतीने विद्यार्थ्यांनाही प्रेरणा
डॉ. निर्भय यांची शांत पण प्रभावी कृती पाहून काही महाविद्यालयीन विद्यार्थीही या मोहिमेत सामील होत आहेत.आपल्या घराजवळील रस्ते किमान आठवड्यातून एकदा स्वच्छ करा, या त्यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.आपल्या परिसरातील रस्त्यावरचा कचरा वेचून स्वच्छ नागपूर मोहिमेला हातभार लावत आहेत.
स्वच्छता ही जबाबदारी प्रत्येकाची — डॉ. कुमार निर्भय
शहर स्वच्छ ठेवणे हे फक्त महानगरपालिकेचे काम नाही; हा प्रत्येक नागरिकाचा कर्तव्यभाव आहे.प्रत्येकाने दर रविवारी फक्त १०० मीटर परिसरातील कचरा उचलण्याचा संकल्प केला, तर नागपूर भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक होऊ शकते, असे डॉ. निर्भय यांनी सांगितले.
महापालिकेकडून गौरव ;अनुकरणीय उपक्रम
डॉ. निर्भय यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.हे काम प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. शहर स्वच्छतेच्या उद्दिष्टासाठी अशा नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने थोडा वेळ दिला, तर शहर स्वच्छ होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही.नागरिकांनीही दर रविवारी १०० मीटर कचरा उचलण्याच्या उतक्रमात सहभागी व्हावे.
-डॉ.अभिजीत चौधरी ,मनपा आयुक्त