पोलिसांकडून कारवाई, मात्र तरीदेखील ऑनलाइन मिळतोय जीवघेणा नायलॉन मांजा
By योगेश पांडे | Updated: January 12, 2025 23:49 IST2025-01-12T23:48:16+5:302025-01-12T23:49:43+5:30
इन्स्टाग्रामसह इंटरनेटवर उघडपणे होतेय विक्री : मनपा प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

पोलिसांकडून कारवाई, मात्र तरीदेखील ऑनलाइन मिळतोय जीवघेणा नायलॉन मांजा
योगेश पांडे
नागपूर : दरवर्षी अनेकांना जखमी करत अगदी प्राणदेखील घेणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानादेखील बाजारपेठेत त्याची विक्री सुरूच आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या आसपासच अनेकांनी बाहेरील राज्यांतून याचा माल बोलावला होता. पोलिसांकडून नायलॉन मांजाविरोधात कारवाई वाढली असताना आता विक्रेत्यांनी ऑनलाइन विक्रीवरदेखील भर दिला आहे. तरुणाईचा कलदेखील ‘ऑनलाइन’ खरेदीकडे जास्त आहे. बंदी असलेला हा मांजा इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर एका ‘क्लिक’वर उपलब्ध आहे. विशेषत : इन्स्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांवरदेखील याची विक्री सुरू आहे. नायलॉन व पॉलिस्टर मांजाची विक्री करणाऱ्या एका कंपनीकडून तर इन्स्टाग्रामवरूनच ‘ऑर्डर्स’ घेण्यात येत आहेत. पोलिस प्रशासनाने ९० हून अधिक पेजेसला ब्लॉकदेखील केले आहे. मात्र तरीदेखील विक्रेते दररोज नवनवीन नावांनी खाती उघडून विक्री करत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे ‘हायटेक’ असण्याचा दावा करणाऱ्या मनपा प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. एखादा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येऊन ठोस कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंटरनेटवरून ‘बल्क ऑर्डर’
पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा लक्षात घेता अनेक विक्रेते ‘ऑनलाइन’ माध्यमातून विक्री करत आहेत. काही जणांकडून इन्स्टाग्रामवरच ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे. याशिवाय एका ई-कॉमर्स संकेतस्थळांवर ‘पॉलिस्टर’मांजा विक्रीला उपलब्ध आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात प्रक्रिया केली असता, संकेतस्थळावर पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा येथील विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक असून ‘बल्क ऑर्डर’देखील स्वीकारल्या जात असल्याची बाब समोर आली.
धोक्याची सूचना, ‘फेसबुक’वर ‘अपडेट्स’
‘इन्स्टाग्राम’वर नागपुरातील एका विक्रेत्याने ‘मोनो काइट मांजा’ या नावाखाली ‘नायलॉन’चा मांजा विक्रीला ठेवला आहे. यात स्पष्टपणे ‘हा मांजा पतंग उडविण्यासाठी वापरू’ नये असे नमूद केले आहे. मात्र, तरीदेखील साडेपाचशे रुपयांना एक चकरी या दराने मांजा उपलब्ध आहे. त्यावर मोनोफिल, मोनोकाइट हे चायनीत मांजा विक्रीसाठी आहेत. असे प्रकार अनेकांनी सुरू केले असून नामांकित कंपन्यांच्या मांजाच्या नावाखाली ‘नायलॉन’, ‘पॉलिस्टर’ मांजाची बिनधास्त विक्री सुरू आहे. लकी नावाच्या एका दुकानाच्या मालकाने तर प्लास्टिक मटेरिअल असूनदेखील मांजा विक्रीला ठेवला आहे.
धोक्याची सूचना असतानादेखील विक्री
देशात अनेक ठिकाणी झालेल्या कारवायांमध्ये ‘मोनोकाइट’ कंपनीच्या नावाने नायलॉन मांजाची विक्री झाल्याचे दिसून आले. या नावाने ‘इन्स्टा’वर विशेष पेजेसदेखील तयार करण्यात आले आहे. त्यात सर्व प्रकारचा मांजा विक्रीसाठी उपलब्ध असून ‘मोनोफील गोल्ड’ नावाच्या मांजाचादेखील समावेश आहे. हा मांजा पतंग विक्रीसाठी वापरणे धोक्याचे असल्याची सूचना चक्रीवर लिहिली असतानादेखील त्याची सर्रासपणे विक्री होत आहे.
अशी सुरू आहे विक्री
- सोशल माध्यमांवर विविध पेजेस
- काही ई-कॉमर्स संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री
- ‘इन्स्टा’च्या माध्यमातून ग्राहकांना संपर्क