पोलिसांनो काळजी घ्या ! नागपूर आयुक्तांनी काढला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:14 IST2020-09-07T23:13:14+5:302020-09-07T23:14:40+5:30
पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांसाठी विशेष उपाययोजना आखल्या आहेत.

पोलिसांनो काळजी घ्या ! नागपूर आयुक्तांनी काढला आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांसाठी विशेष उपाययोजना आखल्या आहेत. कर्तव्य बजावताना सकाळपासून रात्रीपर्यंत पोलिसांनी काय करावे, त्यासंबंधीचे पत्रकच आयुक्तालयात जाहीर करण्यात आले आहे. शहर पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक अशा सुमारे एक हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दहा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यांनी कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक पोलिसांसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत गोळ्या, औषध, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. दर तासाला गरम पाणी पिणे, वाफ घेणे आणि ऑक्सिजनचे प्रमाण दिवसातून दोन वेळा तपासण्याचे सांगितले आहे. सर्व कर्मचाऱ्यावर त्यांच्या-त्यांच्या ठाणेदारांनी तर ठाणेदारांच्या प्रकृतीवर एसीपी आणि डीसीपी यांनी लक्ष ठेवावे असेही म्हटले आहे.
एमआयडीसी पोलिसांची संवेदनशीलता
एमआयडीसी परिसरातील पोलीस कर्मचारी तसेच त्या भागातील गोरगरीब नागरिकांसाठी एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत पुरविणे सुरू केले आहे. या भागातील गोरगरिबांना रोज फूड पेकेट आणि मास्क पुरविले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऑटोरिक्षातुन जनजागरण केले जात आहे. कुणाला कोणतीही अडचण असल्यास पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. ठाण्यातील प्रत्येकाला साबण, मास्क, सॅनिटायझर आणि फेसशील्ड पुरविण्यात आले आहे.