रितिका मालूंना अटक करण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 15, 2024 18:22 IST2024-07-15T18:21:41+5:302024-07-15T18:22:54+5:30
मालूंना नोटीस : येत्या गुरुवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

Police rush to sessions court to arrest Ritika Malu
राकेश घानोडे
नागपूर : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडिज कार चालवून दोन तरुणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या रितिका उर्फ रितू दिनेश मालू (३९) यांना अटक करण्यासाठी तहसील पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या न्यायालयाने सोमवारी मालू यांना नोटीस बजावून यावर येत्या गुरुवारपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायाधीश एस. यू. हाके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पोलिसांच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी बाजू मांडली. मालू यांनी आतापर्यंत प्रकरणाच्या तपासाला कोणतीही मदत केली नाही. उलट पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अपघात झाल्यानंतर त्या सहा तास फरार होत्या. दरम्यान, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले व महत्वाचे पुरावे नष्ट केले. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रकरणाच्या तपासात प्रगती होऊ शकत नाही, असा दावा ॲड. खापर्डे यांनी केला. यापूर्वी पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून मालू यांना अटक करण्याची परवानगी मागितली होती. गेल्या ९ जुलै रोजी तो अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर केला गेला. परिणामी, पोलिसांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे.