जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला पोलिसांचे संरक्षण, जमीनमालकालाच केले बेदखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:14 IST2025-10-29T18:09:12+5:302025-10-29T18:14:23+5:30
वृद्ध, बहीण-भाऊ दहशतीत : न्यायासाठी भटकंती

Police protect land grabbing mafia, evicts landowner
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला आणि त्याच्या साथीदारांना पोलिस पाठीशी घालत आहेत आणि आम्हाला मात्र आमच्याच जमिनीपासून बेदखल केले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आम्ही दहशतीत आलो आहे. त्यामुळे आता न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती प्रमिला गायकवाड, रमेश शंकरराव जाधव सुशिला देवीदास गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
भागातील प्रकरण गोरेवाडा जमिनीचे आहे. गायकवाड आणि जाधव यांची वडिलोपार्जित मौजा गोरेवाडा भागात सुमारे आठ एकर जागा आहे. आज तिची किंमत किमान ७० ते ८० कोटी रुपये आहे. गायकवाड भगिनी आणि जाधव यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानुसार, भूमाफिया दिलीप ग्वालबंशी, दीपक दुबे आणि रश्मी जोशी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या जमिनीवर लेआऊट टाकले आणि प्लॉट विकले. या संबंधाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ग्वालबंशीला अटक केली. तो दोन आठवड्यांनंतर बाहेर आला. तिकडे दुबे आणि जोशीने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर ग्वालबंशीने आपले साथीदारामार्फत प्रमिला गायकवाड यांच्या भावाला मारहाण, धमकी देऊन दशहत निर्माण केली. विशेष म्हणजे, कोट्यवधींची ही जमीन हडपण्यात एक मोठी टोळी असून, त्यात अनेक जण गुंतले आहेत. पोलिस मात्र थातूरमातूर चौकशी करून अनेकांना कारवाईपासून दूर ठेवत आहेत. आपल्या मालकीच्या जमिनीवर जाण्यासाठी आम्हाला मज्जाव केला जातो. धमक्या मिळतात. पोलिस मात्र आता आमच्या तक्रारींना बेदखल करीत आहेत. त्यामुळे आम्ही दहशतीत आलो आहोत, असे या बहीण-भावांनी स्पष्ट केले.
आयुक्तांना भेटूच दिले जात नाही
- आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, पोलिस त्यांच्यावर कडक कारवाई करायला तयार नाहीत. आम्ही न्यायासाठी भटकंती करीत आहोत.
- पोलिस आयुक्तांना भेटून त्यांना हा प्रकार ऐकवण्यासाठी वारंवार सीपी ऑफिसमध्ये जातो. मात्र, आम्हाला आयुक्तांची भेटच घेऊ दिली जात नसल्याचा आरोपही अर्जदारांनी केला आहे.
- गुंडांच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही गरीब आणि वृद्ध आहोत. न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. तसे पत्र आम्ही विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांना दिले आहे. जिवंत असेपर्यंत न्याय मिळाला नाही, तर अन्नत्याग करून आम्ही स्वतःचा शेवट करणार असल्याची भावनाही त्यांनी पत्रकारांसमोर बोलून दाखविली.