कॉंग्रेसच्या 'है तैयार हम'साठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर
By दयानंद पाईकराव | Updated: December 27, 2023 21:10 IST2023-12-27T21:10:14+5:302023-12-27T21:10:21+5:30
तगडा पोलिस बंदोबस्त : वाहतूकीच्या कोंडीचा पोलिसांनी घेतला धसका

कॉंग्रेसच्या 'है तैयार हम'साठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर
नागपूर: कॉंग्रेसच्या उमरेड मार्गावरील दिघोरी नाक्याजवळ असलेल्या मैदानात गुरुवारी २८ डिसेंबरला होत असलेल्या 'है तैयार हम' सभेसाठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून सभास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कॉंग्रेसच्या दिघोरी नाक्याजवळील मेदानात होणाऱ्या सभेसाठी देशभरातील व्हीआयपी कॉंग्रेस नेते उपराजधानीत दाखल होत आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासनाने तगड्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. सभास्थळी ४ पोलिस उपायुक्त, ४ सहायक पोलिस उपायुक्त, ८ पोलिस निरीक्षक यांच्यासह ४५० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सभेच्या ठिकाणी तसेच उमरेड मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची पोलिसांना भिती असल्यामुळे खास वाहतूकीच्या नियंत्रणासाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांसह १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच १७४ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या आहेत.