लाहोरी, बॅरेल कॅफे व मार्टिनी लाऊंजवर पोलिसांची कारवाई, पहाटे चारपर्यंत होते सुरू, नियमावलीचे उघड उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 22:33 IST2025-07-20T22:24:25+5:302025-07-20T22:33:45+5:30
Nagpur Crime News: नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील बार, कॅफे व पब्ज यांना वेळेची मुदत आखून दिली आहे. मात्र, अनेक आस्थापनांकडून या मर्यादेचे पालन करण्यात येत नाही. अशाच तीन बार व पब्जवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांना धक्का दिला आहे.

लाहोरी, बॅरेल कॅफे व मार्टिनी लाऊंजवर पोलिसांची कारवाई, पहाटे चारपर्यंत होते सुरू, नियमावलीचे उघड उल्लंघन
नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील बार, कॅफे व पब्ज यांना वेळेची मुदत आखून दिली आहे. मात्र, अनेक आस्थापनांकडून या मर्यादेचे पालन करण्यात येत नाही. अशाच तीन बार व पब्जवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांना धक्का दिला आहे. यात वारंवार कारवाई होऊनदेखील कुठलीच कारवाई न झालेल्या लाहोरी बार ॲण्ड रेस्टॉरंटचादेखील समावेश आहे. पहाटे चारपर्यंत हे तीनही बार-पब्ज-लाऊंज सुरू होते. अशा आस्थापनांचा परवाना कायमचाच निलंबित करण्याची हिंमत प्रशासनाने दाखवावी असा नागरिकांमध्ये सूर आहे.
पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता ही कारवाई केली. यात अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ येथील बॅरल कॅफे, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉफी हाऊस चौकातील लाहोरी बार ॲण्ड रेस्टॉरंट तसेच मार्टिनी लाऊंज यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आस्थापनांना रात्री दीड वाजण्याची मुदत आखून दिली आहे. ऑपरेशन थंडर राबवीत असताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या मुदतीचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा, तसेच संबंधित पोलिस ठाण्याचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी पहाटे चार वाजता या तीनही ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेथे ग्राहकांना सेवा पुरविल्या जात असल्याचे आढळून आले. रात्री दीड वाजल्यानंतरदेखील मद्य व अन्न पुरविले जात असल्याचे स्पष्ट झाले. उत्पादन शुल्क विभागाकडून बॅरेल कॅफेवर कारवाई करण्यात आली, तर लाहोरी बार व मार्टिनी लाऊंज येथे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन कराल तर खबरदार
अशाप्रकारे नियमाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या बाबी पोलिसांकडून खपवून घेतल्या जाणार नाही. बार, कॅफे, रेस्टॉरंट चालकांनी दिलेले वेळचे निर्बंध पाळावे. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. रात्री उशिरा सुरू असलेले आस्थापना किंवा बेकायदेशीर संचालन करणारे, मद्यविक्री करणाऱ्या तत्त्वांबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.