पंतप्रधानांनी दाखवली पुणे-अजनी-पुणे ‘हमसफर एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:34 IST2019-02-16T21:32:57+5:302019-02-16T21:34:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विविध विकास प्रकल्पांची आधारशिला ठेवली. या विकास कामांचे लोकार्पण करून पंतप्रधानांनी नवीन कामाचे बटन दाबून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे-अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेच्या दौंड-मनमाड-भुसावळ-बडनेरा मार्गक्रमणाची घोषणाही केली.

पंतप्रधानांनी दाखवली पुणे-अजनी-पुणे ‘हमसफर एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विविध विकास प्रकल्पांची आधारशिला ठेवली. या विकास कामांचे लोकार्पण करून पंतप्रधानांनी नवीन कामाचे बटन दाबून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे-अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेच्या दौंड-मनमाड-भुसावळ-बडनेरा मार्गक्रमणाची घोषणाही केली.
ही गाडी आठवड्यातून एक दिवस असून एकदा अजनी व एकदा मुख्य स्थानकाहून सुटणार आहे. नागरिकांची पुणेसाठ़ी आणखी एका वेगवान गाडी सोडण्याची मागणी दीर्घ काळापासून होती, ती आज पूर्ण झाली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सर्वांचे स्वागत केले.
नागपुरात पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपुरात अजनी रेल्वे स्थानकावर अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवून या गाडीच्या प्रवासाचा शुभारंभ केला व गाडीतील प्रवाशांना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. अजनी रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ.डॉ. मिलिंद माने, भाजपा नेते अरविंद गजभिये, रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक त्रिलोक कोठारी, मुख्य यांत्रिक अभियंता मनोज जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी रेल्वे प्रशासनाने पांढरकवड्याच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण अजनी स्थानकावर उपलब्ध केले होते.