कबुतरांमुळे होतात ६० प्रकारचे आजार, दाणे घालाल तर तुरुंगात जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:53 IST2025-08-11T19:52:49+5:302025-08-11T19:53:43+5:30
आरोग्य धोक्यात : विष्ठा, पंख आणि पिसांमुळे जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरतात

Pigeons cause 60 types of diseases, if you feed them you will go to jail
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली असून, आता या कबुतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. या आदेशानंतर मुंबईत पहिला गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. कबुतरांमुळे ६० पेक्षा अधिक प्रकारचे गंभीर आजार पसरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
कबुतरांमुळे अस्थमासह इतरही गंभीर आजार
कबुतरांमुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार पसरतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे आणि पिसांमुळे अनेक जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरतात. अस्थमा (दमा) हा यातील एक प्रमुख आजार आहे. याशिवाय, फुप्फुसाचे आजार, न्यूमोनिया आणि इतर श्वसनविकार यांचाही यात समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्याला पोहोचतोय धोका
शहरांमध्ये वाढलेल्या कबुतरांच्या संख्येमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे हवा प्रदूषित होते आणि त्यातून गंभीर आजार पसरतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांसाठी हा धोका अधिक असतो.
कबुतरांची संख्या वाढली
गेल्या काही वर्षांपासून नागपुरातही कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरात काही ठिकाणी कबूतर पाळले जातात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाणे टाकले जात असल्याने त्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींच्या बाल्कनी आणि टेरेसवर कबुतरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
श्वास घ्यायला अडचण येणे किंवा धाप लागणे, सतत कोरडी खोकला, छातीत जडपणा किंवा दुखणे, थकवा, ताप, स्नायूंमध्ये वेदना, वजनात अचानक घट
बाल्कनी, टेरेसवर कबुतरांचा उच्छाद, जागोजाग विष्ठा
शहरातील बहुसंख्य उंच इमारतींमध्ये अनेक ठिकाणी बाल्कनी, टेरेसवरच नाही तर मेट्रो स्टेशन व उड्डाणपुलाच्या जागी कबुतरांचा उच्छाद वाढला आहे. यामुळे सर्वत्र त्यांची विष्ठा पसरते, जी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
प्राणिमात्रांवर दया, पण आरोग्याला धोका
अनेक लोक कबुतरांना दाणे टाकतात, कारण त्यांना प्राणिमात्रांवर दया दाखवायची असते. पण, यामुळे मानवी आरोग्याला किती धोका निर्माण होतो याची त्यांना कल्पना नसते. दया आणि मानवी आरोग्य यांच्यात समतोल राखणे गरजेचे आहे.
शहरात कबूतर पाळणाऱ्यांचे काय ?
शहरातील अनेक ठिकाणी कबूतर पाळले जातात. या ठिकाणी दाणे टाकणे टाकले जातात. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ शकते. यावर प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
"कबुतरांच्या संपकार्मुळे होणारा 'हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस' हा एक फुप्फुसांचा गंभीर आजार आहे, ज्यास 'बर्ड ब्रिडर्स लंग' किंवा 'बर्ड फॅन्सिअर्स लंग' असेही म्हणतात. हा आजार कबुतरांची विष्ठा, पिसे किंवा धुळीचे कण वारंवार श्वासातून शरीरात गेल्याने होतो. फुप्फुसांच्या एल्व्हिओली या भागात सूज येते आणि इम्यून रिअॅक्शन होते. वेळेवर निदान न झाल्यास फुप्फुसांच्या पेशींमध्ये कायमची जखम किंवा फिब्रोसिस होऊ शकते."
- डॉ. अशोक अरबट, वरिष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ