पेट्रोल-डिझेल वॅगनमधून उडाला आगीचा भडका, नागपूर रेल्वेस्थानकात भीतीमुळे प्रवाशांची पळापळ
By नरेश डोंगरे | Updated: February 16, 2025 20:44 IST2025-02-16T20:43:22+5:302025-02-16T20:44:26+5:30
तातडीने मिळविले आगीवर नियंत्रण

पेट्रोल-डिझेल वॅगनमधून उडाला आगीचा भडका, नागपूर रेल्वेस्थानकात भीतीमुळे प्रवाशांची पळापळ
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या मालगाडीच्या वॅगनमधून अचानक आगीचा भडका उडाला. आगीचे लोळ फलाटावरील शेडला लागल्याने भयंकर स्थिती निर्माण झाली. परिणामी प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. रविवारी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्यात यश मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
पेट्रोल-डिझेल भरून रतलाम येथून तडाली येथे जाणारी मालगाडी रविवारी दुपारी ३:४५ वाजता फलाट क्रमांक १ आणि २ च्या मध्ये मेनलाइनवर आली. अचानक या गाडीच्या एका वॅगनमधून आगीचा भडका उडाला. क्षणातच आग फलाटच्या शेडपर्यंत पोहोचली. यावेळी तेलंगणा एक्स्प्रेस बाजूच्या फलाटावर उभी होती. आगीचे लोळ पाहून त्या गाडीतील तसेच फलाटावरील प्रवासी भयभीत झाले. काहींना ही आग आपल्याच गाडीला लागल्याचा भास झाला. त्यामुळे तेलंगणातील प्रवाशांनी भराभर गाडीखाली उतरणे सुरू केले. आगीचे रौद्ररूप पाहून फलाटावरील प्रवासीही पळत सुटले. यामुळे रेल्वे स्थानकावर एकच हल्लकल्लोळ निर्माण झाला. दरम्यान, यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान, लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धावपळ सुरू केली. एकीकडे स्थानकावर असलेल्या अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे अग्निशमन विभागाची गाडी बोलाविण्यात आली. तीसुद्धा वेळेत पोहचली. त्यामुळे काही वेळेतच आग नियंत्रणात आली.
मोठा अनर्थ टळला
पेट्रोल-डिझेलच्या टँकरने भरलेल्या मालगाडीला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. कारण अतिज्वलनशील पेट्रोल, डिझेलमुळे आग अनियंत्रित होण्याचा धोका होता. अशात बाजूलाच तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये आणि स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते. टँकरने पेट घेतला असता तर स्फोट होऊन मोठी जीवित हानी झाली असती. मात्र, कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.
मालगाडी अजनी यार्डमध्ये
आग विझविल्यानंतर या मालगाडीला लगेच अजनी यार्डमध्ये नेण्यात आले. तेथे इंडियन ऑइल आणि अग्निशमन विभागाच्या पथकाकडून गाडीच्या सर्वच्या सर्व वॅगनची तपासणी करण्यात आली. दुसरीकडे तेलंगणा एक्स्प्रेस तातडीने स्थानकावरून दिल्ली मार्गाने रवाना करण्यात आली.
आगीच्या कारणांचा शोध सुरू
आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चौकशी सुरू आहे, असे अधिकारी म्हणतात. लवकरच आगीचे कारणही स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.