सुमेध वाघमारे नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील (एसएसएच) विदर्भातील एकमेव गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. बदलती जीवनशैली, वाढती व्यसनाधीनता आणि आहारातील असंतुलन यांचा थेट परिणाम पचनसंस्थेच्या आजारांवर होत असून, त्याचे प्रतिबिंब या विभागात मागील तीन वर्षांत सुमारे ४६ टक्क्याने वाढलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. पूर्वी किरकोळ वाटणारे पोटाचे त्रास आज गंभीर स्वरूप धारण करत आहे. वेळेवर निदान न झाल्यास ते जीवघेणे ठरत आहे. अशा परिस्थितीत एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपीसारख्या आधुनिक तपासण्यांमुळे आजारांचे लवकर व अचूक निदान शक्य होत आहे. त्यामुळे उपचार अधिक प्रभावी आणि रुग्णकेंद्री होत आहेत. ‘सुपर’च्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २०२२ मध्ये उपचार घेणाºया रुग्णांची संख्या १४,१९२ इतकी होती. अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे २०२५ मध्ये ही संख्या थेट २०,७५८ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातून केवळ मंगळवार व शुक्रवार असे दोनच दिवस ओपीडी सुरू असतानाही एवढी मोठी रुग्णसंख्या उपचारासाठी येत आहे, हे या विभागावरील विश्वास आणि गरज दिसून येते.
नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ
तपशीलवार पाहता, २०२२ मध्ये जुन्या रुग्णांची संख्या ८,२५४ तर नव्या रुग्णांची संख्या ५,९३८ असे एकूण १४,१९२ रुग्णसंख्या होती. २०२३ मध्ये ही संख्या वाढून एकूण १६,८१८ झाली. २०२४ मध्ये ओपीडी रुग्णसंख्या २०,९१३ पर्यंत पोहोचली, तर २०२५ मध्ये १२,५०४ जुने आणि ८,२५४ नवे रुग्ण असे एकूण २०,७५८ रुग्णांनी उपचार घेतले. नव्या रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पोटाच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट संकेत देते.
तीन वर्षांत एकूण १७,७१८ एन्डोस्कोपी
पचनसंस्थेच्या आजारांचे अचूक निदान करण्यासाठी एन्डोस्कोपी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या पार्श्वभूमीवर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात मागील तीन वर्षांत एकूण १७,७१८ एन्डोस्कोपी प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत. २०२२ मध्ये ४,९२४, २०२३ मध्ये ६,०७७ आणि २०२५ मध्ये ही संख्या वाढून ६,७१८ वर गेली आहे. या आकडेवारीवरून निदान सुविधा किती मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत, हे लक्षात येते.
दर्जेदार उपचार आणि वेळेत निदान
या विभागाच्या यशस्वी कायार्मागे विभागप्रमुख डॉ. अमोल समर्थ आणि त्यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय टीमचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. अद्ययावत संसाधने, कमी ओपीडी दिवस आणि वाढती रुग्णसंख्या अशा परिस्थितीतही दर्जेदार उपचार आणि वेळेत निदान देण्याचे काम ही टीम करत आहे.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग रुग्णांसाठी जीवनदायी
विदभार्सारख्या भागात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या तज्ज्ञ सेवा मर्यादित असल्याने मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हा विभाग हजारो रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. वाढती ओपीडी रुग्णसंख्या आणि तपासण्यांची संख्या ही केवळ आकडेवारी नसून, समाजात आरोग्याबाबत वाढलेली जाणीव आणि या विभागावरील विश्वास दर्शवते.- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल
Web Summary : Nagpur's Super Speciality Hospital sees a 46% rise in gastroenterology patients in three years. Changing lifestyles and poor diets are driving increased digestive ailments, requiring more endoscopies for accurate diagnosis and timely treatment.
Web Summary : नागपुर के सुपर स्पेशियलिटी अस्पताल में तीन वर्षों में गैस्ट्रोएंटरोलॉजी के रोगियों में 46% की वृद्धि देखी गई। बदलती जीवनशैली और खराब खानपान से पाचन संबंधी बीमारियाँ बढ़ रही हैं, जिसके लिए सटीक निदान और समय पर उपचार के लिए अधिक एंडोस्कोपी की आवश्यकता है।