प्रवाशांनी घ्यावी नोंद : नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाच ५२ दिवसांसाठी बंद
By नरेश डोंगरे | Updated: September 7, 2025 18:56 IST2025-09-07T18:56:07+5:302025-09-07T18:56:17+5:30
विकासकामांचे निमित्त; आजपासून होणार अंमलबजावणी

प्रवाशांनी घ्यावी नोंद : नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाच ५२ दिवसांसाठी बंद
नागपूर: मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विविध महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत फलाट क्रमांक पाच सोमवारी, ८ सप्टेंबर २०२५ पासून ५२ दिवसांकरिता पूर्णतः बंद राहणार आहे.
येथील मुख्य रेल्वे स्थानकावर पुनर्विकासांची विविध कामे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून फलाट क्रमांक पाचचे काम सोमवारपासून सुरू केले जाणार आहे. ते २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत कॉनकोर्सचे फाउंडेशनचे काम वेगात पार पाडले जाईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. यामुळे होणाऱ्या अडचणींचा विचार करून गाड्यांच्या संचालनासाठी काही महत्त्वपूर्ण तात्पुरत्या बदलांची माहितीही रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. फलाट क्रमांक ५ वरून सुटणाऱ्या १८ गाड्यांचे दुसऱ्या फलाटांवरून संचालन केले जाणार आहे.
त्यानुसार ट्रेन नंबर २२१२५/२२१२६ अमृतसर-नागपूर एसी एक्स्प्रेस आता फलाट क्रमांक ७ वरून सुटणार आहे. ट्रेन नंबर ११२०१ नागपूर शहाडोल एक्स्प्रेस फलाट क्रमांक ७ वरून, २०९११/२०९१२ इंदोर नागपूर फलाट क्रमांक ६ आणि ७ वरून आमला मार्गावरून धावणाऱ्या मेमू गाड्या (६१११७ /६१११८/ ६१११९ आणि ६११२०) तसेच वर्धा मार्गावरून धावणाऱ्या ६११०९/६१११० आता फलाट क्रमांक ४ वरून सोडल्या जातील.
वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर पुणे फलाट क्रमांक १, नागपूर सिकंदराबाद फलाट क्रमांक ६, जयपूरला जाणारी गाडी फलाट क्रमांक ३ आणि अहमदाबाद हावडा फलाट क्रमांक ३ वरून जाईल.
------------------
शॉर्ट टर्मिनेशन व ओरिजिनेशन
०११४० मडगाव–नागपूर एस्क्प्रेस ही गाडी आता अजनी येथेच थांबवली जाईल. तर, ०११३९ नागपूर–मडगाव एक्स्प्रेस ही गाडीदेखील अजनी येथून सुरू केली जाईल. या दोन्ही गाड्यांच्या १५ फेऱ्या अशा स्वरूपात राहतील.
------------------
महत्त्वाची सूचना
या बदलानुसारच मेमू गाड्यांचे नियमन करण्यात आले असून गाडी क्रमांक ६१११७,६१११८, ६१११९ आणि ६११२० या गाड्यांचे वेळापत्रक १०–२० मिनिटांनी बदलले जाईल. हे बदल तात्पुरते असून त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना अॅप किंवा रेल्वे चौकशी पोर्टलवरून माहिती घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.