हिंदू-मुस्लीम लढाई अन् काश्मिरची अर्थव्यवस्था संपवण्यासाठीच पाकिस्तानचा हल्ला-हुसैन दलवाई

By आनंद डेकाटे | Updated: April 27, 2025 21:12 IST2025-04-27T21:11:57+5:302025-04-27T21:12:09+5:30

दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

Pakistan's attack is to end Hindu-Muslim unity and Kashmir's economy - Hussain Dalwai | हिंदू-मुस्लीम लढाई अन् काश्मिरची अर्थव्यवस्था संपवण्यासाठीच पाकिस्तानचा हल्ला-हुसैन दलवाई

हिंदू-मुस्लीम लढाई अन् काश्मिरची अर्थव्यवस्था संपवण्यासाठीच पाकिस्तानचा हल्ला-हुसैन दलवाई

नागपूर: हिंदू-मुस्लीम यांच्यात लढाई निर्माण करावी आणि काश्मिरमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे संपवायची या दुहेरी उद्देशानेच पाकिस्तानने काश्मिरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडविला, असे मत माजी खासदार हुसैन दलवाई यांनी येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे मातोश्री विमलताई देशमुख सभागृह धनवटे नॅशनल काॅलेज येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण, ॲड. फिरदौस मिर्झा, डाॅ. के.जी. पठाण, प्रभू राजगडकर, प्रा. जावेद पाशा कुरेशी, ॲड. रमेश पिसे प्रामुख्याने उपस्थित होते.

हुसैन दलवाई म्हणाले, पाकिस्तानच्या सरकारने ज्या उद्देशाने काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला घडविला, त्या उद्देशाला हवा देण्याचे काम येथील सरकारही करीत आहे. परंतु येथील बहुजन हिंदू हे समजदार आहेत. ते त्यांचा उद्देश कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र संतानी घडविले आहे. त्यात मुस्लीम सुफी संतांचेही मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.

ॲड. फिरदौस मिर्झा यांनी मुस्लीमांना नवीन युगाची कास धरण्याचे आवाहन केले. संविधानाच्या माध्यमातून आपल्याला विकासाचा मार्ग गवसला आहे. ते ओळखण्याची गरज आहे. ऊर्दू भाषेच्या मागे न लागता मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवा, या भाषांच्या संस्था तयार करा. या भाषांमधून लिखान करा, व्यक्त व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रा. जावेद पाशा म्हणाले, मुस्लीम समाजाची संस्कृती लोकांसमोर आली पाहिजे. आपण लिहिते झालो पाहिजे, व्यक्त झालो पाहिजे. आपली खऱ्या वेदना, मुस्लीमांचा खरा इतिहास लोकांसमोर येऊ द्या, त्यासंदर्भात लिखान करा, असे आवाहन केले. प्रा. डाॅ. अस्लम बारी यांनी संचालन केले.
सांस्कृतिक समरसता निर्माण करा - संमेलनाध्यक्ष डाॅ. श.नू. पठाण

संमेलनाध्यक्ष डाॅ. श.नू. पठाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आज खऱ्या अर्थाने सांस्कृतिक समरसता निर्माण करण्याची गरज आहे. हिंदूत्व म्हणजे मुस्लीमांचा द्वेश नाही तर ती भारतीय एकात्मता आहे. यासंदर्भातील त्यांनी एक पुस्तकही लिहिले असून ते पुस्तक यावेळी मोफत देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुस्लीम मराठी साहित्य संमेलन- जोड
- डाॅ. विश्वनाथ कराड यांचा सत्कार यावेळी माईर्स एमआयटी पुणे चे संस्थापक डाॅ. विश्वनाथ कराड यांनी आळंदी येथे विश्वशांती केंद्र उभारले आहे. त्याबद्दल या संमेलनात त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष डाॅ. श.नू. पठाण यांच्या हस्ते कराड यांच्या कन्या स्वाती कराड यांनी स्वीकारला.

असे झाले ठराव
- कुठल्याही प्रकारचा दहशतवाद इस्लामला मान्य नाही. सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्याचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम मध्ये मुस्लिम साहित्यिकाचा विद्यापीठ स्तरातील अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावा.
- डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने प्रत्येक विद्यापीठांमध्ये शैक्षणिक अध्यासन उघडण्यात यावे.
- मुस्लिमांच्या सामाजिक, सांस्कृतिक सवैधानिक अधिकारांचे जतन व संवर्धन करण्यात यावे.
- द्वेषमुलक वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी.
- गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती द्यावी. तसेच जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहे निर्माण करावीत.
- अल्पसंख्याक समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थ संकल्पात तरतूद करावी.
- भारतरत्न मौलाना आझाद यांचे समग्र वाड्मय मराठीत भाषांतर करून प्रकाशित करावे.
- कुठल्याही प्रार्थना स्थळाची धार्मिक ओळख देशाच्या स्वातंत्र्यादिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी जी आहे ती कायम ठेवावी. त्याचे धर्मांतरण,रूपांतर करण्यात येवू नये असा धार्मिक पूजा स्थळ कायदा १९९१ रोजी मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करावी.

Web Title: Pakistan's attack is to end Hindu-Muslim unity and Kashmir's economy - Hussain Dalwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.