३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था
By नरेश डोंगरे | Updated: February 11, 2025 00:51 IST2025-02-11T00:50:54+5:302025-02-11T00:51:32+5:30
नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था
नागपूर : प्रयागराजला सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक रेल्वेगाडी प्रवाशांनी खच्चून भरून धावत आहेत. रविवारी दिवसभरात प्रयागराज येथून ३३० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून १२ लाख, ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर, सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत १९१ गाड्यांमधून ८ लाख, १८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विानयक गर्ग तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकारांना दिली.
प्रयागराजमध्ये भाविक प्रचंड संख्येत जमा झाल्यामुळे तेथे ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाल्याचे सचित्र वृत्त चोहोबाजूने येत आहे. वाहतुक व्यवस्था कोलमडल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य आणि दपूम रेल्वेच्या व्यवस्थापकांनी तडकाफडकी स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेऊन रेल्वे प्रवासी आणि स्थिती विशद केली. प्रयागराजमध्ये एकूण ८ रेल्वे स्थानक असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपुरातून ३० हजार प्रवासी
नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
तिकीट तपासणीची विशेष मोहीम
प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवासी प्रवास करीत आहे. त्यांच्यामुळे तिकीट काढून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते लक्षात घेता मंगळवारपासून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीने कुंभमेळा स्पेशल ट्रेनमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रवाशांना आवाहन -
२६ फेब्रुवारीपर्यंत नागपूरहून आणखी काही रेल्वे गाड्या चालविण्याचा विचार आहे. कुंभमेळाकरिता प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. मात्र, सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.